आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारानृत्य:अहमदनगरमध्ये मान्सूनच्या सरी बसरल्या, आतापर्यंत 17 मिलिमीटर पावसाची नोंद

अहमदनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अहमदनगर शहरात सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत व्यावसायिकांची धावपळ उडाली. दरम्यान आतापर्यंत अहमदनगर शहरासह जिल्ह्यात 17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी या कालावधीपर्यंत सरासरी 44 मिलिमीटर पावसाची नोंद होत असते.

अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील संगमनेर, अकोले व दक्षिण भागातील पारनेर या तालुक्यात दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या पावसामुळे घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले होते. वीज व वादळी वार्‍याच्या पावसामुळे जनावरे देखील दगावली होती. तीन तालुके वगळता इतरत्र मात्र पावसाने दडी मारली होती. शनिवारी पाथर्डी ,शेवगाव, नगरसह अन्य तालुक्यात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 1 जून पासूनच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते, यंदा मात्र काही दिवस पाऊस लांबणीवर पडला होता त्यामुळे चिंता वाढली होती. अहमदनगर शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील दिल्ली गेट ,पाईपलाईन रोड, सावेडी नवनागापूर, भिंगार, केडगाव,तपोवन रोड या भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. अहमदनगर शहरात दिवसभर कडक ऊन व ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

व्यावसायिकांची धांदल

शनिवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील बाजारपेठेत व्यवसायिकांची धावपळ उडाली. तपोवन रोड परिसरात सुरू झालेल्या पावसामुळे भाजी विक्रीसाठी बसलेल्या व्यावसायिकांची देखील धांदल उडाली.

बातम्या आणखी आहेत...