आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीडशे कोटींच्या घोटाळा:कर्ज प्रकरणे, आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक ऑडिटची प्रक्रिया सुरू

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्बन बँकेतील कर्ज प्रकरणातील दीडशे कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेतून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांचे, तपासात आढळलेल्या व्यवहार व अन्य बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. या संदर्भात प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

बँकेच्या २८ संशयास्पद कर्जखात्यांसह सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची १५० कोटीची फसवणूक केल्याच्या राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण आव्हाड करत आहेत. तपासादरम्यान कर्जाच्या रकमेतील व्यवहारांच्या महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या होत्या. थकीत कर्ज प्रकरणे मिटवण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी दुसरे कर्ज करून त्या रकमा संबंधित कर्ज खात्यात वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. तसेच, कर्जाच्या रकमेचा गैरवापर होत असताना व सदर रकमा दुसऱ्या खात्यात वर्ग करताना संबंधित कर्जदाराच्या सह्या नसल्याचे समोर आले होते.

वेगवेगळ्या खात्यातून या रकमा फिरवत शेवटी ज्या व्यक्तीपर्यंत रक्कम गेली, त्याचा तपासही करण्यात आला आहे. या प्रकरणात बँकेच्या तीन ते चार संचालकांसह काही अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदविण्यात आलेले आहेत. तपासात प्राप्त झालेली कागदपत्रे, बँकेतील व्यवहारांच्या नोंदी, कर्ज प्रकरणे आदी सर्व बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे. शासनाच्या पॅनल वरील ऑडिटरमार्फत ही सर्व तपासणी होणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

दोषींना अटक होत नसल्याने ठेवीदार, सभासदांमध्ये नाराजी
१५० कोटींच्या घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने आरबीआयकडून अहवालही मिळवला आहे. यात बँकेतील गैव्यवहारप्रकरणी अनेक आक्षेप आहेत. कर्ज प्रकरणातील रकमा कोणाच्या खात्यात गेल्या, याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. मात्र, तरीही पोलिसांकडून एकाच आरोपीला अटक केली आहे. बँकेचे लायसन रद्द करण्याची नोटीस आरबीआयने बजावलेली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात ठोस कारवाई व दोषींना अटक होत नसल्याने ठेवीदार व सभासदांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...