आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये झुंडशाहीविरोधात आंदोलन:पोलिस निरीक्षकाविरोधात व्यापारी आक्रमक, अवैध धंद्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी व्यापारी संघटनेतर्फे गुरुवारी सकाळी कुकाणे येथे बसथांब्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर युवक संघटनेच्यावतीने याच मागणीसाठी पुकारलेल्या बंदलाही प्रतिसाद मिळाला.

नेवासे पोलिस निरीक्षक करे यांच्या संभाषण क्लिप प्रकरण लाचलुचपत विभागाकडे द्यावे.घरफोड्या, चोऱ्यांचा तपासातील अपयश, वाढलेले अवैध धंदे बंद करावेत, संघटीत झुंडशाहीचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी कुकाणे व्यापारी संघटनेतर्फे नेवासे शेवगाव मार्गावर रास्ता रोको, तर निरीक्षक करे यांच्या कार्यपद्धती जातीधर्मात तेढ वाढत चालल्याने त्यांच्यावर कारवाई करावी यामागणीसाठी युवा संघटनेतर्फे कुकाणे बंदच्या आवाहनास व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवत प्रतिसाद दिला.

आंदोलकांचा संताप

कुकाणे बसथांब्यांजवळ रास्ता रोको आंदोलनात भाजप नेते चंपालाल बोरा, मनसे नेते विलासराव देशमुख, व्यापारी संघटनेचे नेते जवाहर भंडारी मुस्लिम समाजाचे नेते रसुलभाई इनामदार लहुजी सेनेचे नेते भैरवनाथ भारस्कर,जाणता राजा मंडळाचे राहुल जावळे, माउली तोडमल आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांनी पोलिस अधिकारी व स्थानिक झुंडशाही बद्दल संताप व्यक्त केला.

उपअधीक्षक मिटकेंनी स्वीकारले निवेदन

श्रीरामपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. घरावर दरोडा पडून वर्ष उलटले तरी तपास न लागल्याने शामसुंदर खेसे यांनीही उपअधीक्षक मिटके यांना निवेदन दिले.

ज्येष्ठ नेते अशोक चौधरी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बरमेचा, शिवसेनेचे राजेंद्र बागडे, जावेद शेख, राजेंद्र राऊत, जाणता राजा मंडळाचे युनुस नालबंद, समीर पठाण, सरपंच एकनाथ कावरे, राजेंद्र बाफना आदींचा आंदोलनात समावेश होता.

शेवगावचे पोलिस निरीक्षक पुजारी, सोनई ठाण्याचे निरीक्षक माणिकराव चौधरी, शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामचंद्र कर्पे, नेवाशाचे सहायक निरीक्षक रामचंद्र थोरात, उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे व गावंडे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला. प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी वाहनांना जाण्यासही मुभा दिली होती.

पोलिसांना व्यापाऱ्यांनी जुमानले नाही

व्यापारी संघटनेच्यावतीने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आला असताना कुकाणे दुरक्षेत्राचे हवालदार कोळपे यांनी पोलिस वाहनात येत बसथांबा परिसरात काही दुकाने उघडण्यास बळजबरी केली. पण व्यापाऱ्यांनी त्यांना जुमानले नाही. त्याप्रकाराचा उल्लेख वक्त्तांनी भाषणात करुन कोळपे यांचेवर कारवाईची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...