आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याचा पाथर्डी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने ॲड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
आंबेडकर चौकात महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते जमा झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय महामार्गावर मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मंत्री पाटील यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद, खोके सरकार मुर्दाबाद, माफी मागा, माफी मागा, अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष नासीर शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश रासने, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, देवा पवार, राजेंद्र शिरसाट, कृष्णा आंधळे, विनय बोरुडे, आनंद सानप, महेश दौंड, हुमायून आतार, चंद्रकांत भापकर, चांद मणियार, शिवसेनेचे सचिन नागापुरे वसंत बोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ढाकणे यांनी सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यातील जनतेच्या दुर्दैवाने अक्कल नसलेले लोक सत्तेत बसले आहेत. भाजप नेते सतत महापुरुषांचा अवमान करून जनतेच्या भावना दुखावत आहेत. अलीकडे काही जणांचे महापुरुषाबद्दल वक्तव्य ऐकून यांच्या बुद्धीची कीव येते. लायकी नसताना यांना राज्याचे मंत्रीपद मिळाले आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर मतांची भीक मागणारे त्यांचा अपमान करत असल्याचे पाहून वाईट वाटते. याचे उत्तर त्यांना हा स्वाभिमानी महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही. भारताचा इतिहास ज्यांच्याशिवाय लिहिला जाणार नाही, अशा शिवराय व डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार यांना नाही. भाजपमध्ये महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धा लागली आहे. मूलभूत प्रश्नांपासून व बेरोजगारी महागाई अशा मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा यांना वेळीच जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.