आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. कांदाउत्पादक कर्जबाजारी होत आहेत. सरकारने त्वरित कांद्यास तीन हजार रुपये हमीभाव व विकलेल्या कांद्यास एक हजार रुपये अनुदान जाहीर न केल्यास, रासपतर्फे राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी दिला. कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव द्यावा, तसेच एक हजार अनुदान देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून गुरुवारी (२ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी रासपचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सचिव रवींद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, नगर जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर, शहर अध्यक्ष चिमाजी खामकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सचिव रवींद्र कोठारी यांनी भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात कांदाउत्पादन झालेय. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी क्विंटलमागे दीड हजार रुपये खर्च येतो.
आज बाजारात ३०० ते ५०० रुपये क्विंटल या दराने कांदा विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना विकलेल्या कांद्यासाठी प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान व प्रति क्विंटल किमान तीन हजार रुपये हमीभाव द्यावा, अन्यथा रासपच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गोल्टी कांदा ३ रुपये किलो
बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक सुरू आहे. कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेली घसरण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. एक नंबर कांदा ८०० ते ११०० रुपये प्रति क्विंटल, तर गोल्टी कांदा ३०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल दराने वांबोरी बाजार समितीत गुरुवारी विकला गेला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.