आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व तालुक्यात वाढते दरोडे, चोऱ्या व गुन्हेगारीमुळे दहशतीचे वातावरण आहे. पोलिस यंत्रणा तपास लावण्यात अपयशी ठरत असल्याने त्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम पोलिस निरीक्षकाची येथे नियुक्ती करावी व गुन्ह्याचा तपास लावावा, अशी मागणी संगमनेर व्यापारी असोसिएशनने पोलिस उपअधिक्षक संजय सातव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
२-३ महीन्यापासून संगमनेर शहर, उपनगरे व परिसरात दरोडे, चोऱ्या खून, लूटमार व अन्य गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वृध्द, महीला व लहान मुलांवर जीवघेणे हल्ले होत आहे. पोलिस प्रशासनाचा वचक न राहिल्याने गुन्हेगारी फोफावली आहे. गुन्हेगार खुलेआम लूटमार करत आहे. शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण केली जात आहे. संगमनेरची बाजारपेठ मोठी असल्याने सध्याच्या लग्नसराईत येथे मोठी आर्थिक उलाढाल होते. चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने व्यापारी वर्गात चिंता आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
पोलिस उपअधीक्षक संजय सातव व निरीक्षक राजेंद्र भोसले हे दोन्ही अधिकारी प्रभारी असल्याने त्यांचा प्रभाव पोलिस यंत्रणेवर पडताना दिसत नाही. यासाठी येथे सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे. पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व निरीक्षक मुकुंद देशमुख यांची बदली झाल्यापासून गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे. शहर व तालुक्यात घडलेले दरोडे, चोऱ्या व अन्य गुन्ह्यांचा तपास लावावा. सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. आठवडाभरात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, सचिव शरद गांडोळ, जुगलकिशोर बाहेती, खजिनदार अरुण शहरकर, माजी अध्यक्ष श्रीगोपाळ पडतानी, शिरीष मुळे, प्रकाश कलंत्री, प्रकाश राठी, नरेंद्र चांडक, संजय कुठे, कपिल टाक, प्रकाश वालझाडे, सदस्य व व्यापारी वर्गाने सातव यांना दिला. वेळीच कार्यवाही करून गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.