आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:जाती-पंथाची पायताणे बाजूला सारून राष्ट्रहित वाढवण्यासाठी प्रयत्न करा; महंत भास्करगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

नेवासे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व जातीपंथाच्या सवंगड्यांना एकत्रित करून जीव ब्रम्ह ऐक्याचा काला केला. त्यामुळे जाती पंथाची पायताणे बाजूला ठेवून राष्ट्रहित वाढीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले. नेवासे येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात आळंदी येथील डॉ. रविदास महाराज शिरसाठ यांच्या सूश्राव्य वाणीतून आयोजित संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र भावामृत ज्ञानयज्ञ कथा सोहळयाची भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.

यावेळी झालेल्या कीर्तनप्रसंगी सोहळा संयोजक व कथा प्रवक्ते श्रीक्षेत्र आळंदी येथील डॉ. रविदास महाराज शिरसाठ यांनी माऊलींच्या दरबारात कथा उत्साहपूर्ण समाधान व्यक्त करत सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष काळे व त्यांच्या सर्व समिती सदस्यांना धन्यवाद दिले. नेवासे तालुक्यातील नियोजनाप्रमाणे दरवर्षी कथा कार्यक्रम होईल, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, संत ज्ञानेश्वर माउलींनी याच भूमीत विश्वाला न्हाऊ घालणारे शब्द ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रकट केले व ते समाजाला दिले. संत चरित्र हे अदभुत असून चरित्र श्रवणाने मनुष्य जीवाला एक वेगळी दिशा मिळते, तर सुखाच्या प्राप्तीसह दुःख पचवण्याची ऊर्जा देखील मिळते, देशाचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करा, लहानांचे कौतूक व मोठ्यांचा आदर करा, वृद्धांचे विचार व तरुणांच्या ताकदीने राष्ट्रीय व धार्मिक विचार वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा.

यावेळी सोहळासमितीचे मार्गदर्शक डॉ. रविदास महाराज शिरसाठ, सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष काळे, सदस्य रामभाऊ जगताप, सुभाष मते, अनिलराव ताके, नानासाहेब डौले, बदाम महाराज पठाडे, बाळासाहेब डहाके, प्रवीण बोरकर यांच्या हस्ते महंत भास्करगिरी बाबा व डॉ. रविदास महाराज शिरसाठ यांचे संतपूजन करण्यात आले. यावेळी पंढरीनाथ महाराज माने, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रामनाथ महाराज पवार, गणपत महाराज आहेर, दादा महाराज साबळे, बाळू महाराज कानडे, कृष्णाभाऊ पिसोडे, गहिनीनाथ महाराज आढाव, गणेश महाराज दरंदले, अशोक महाराज पांडव, अगस्ती मंदिराचे भिसे बाबा, रावसाहेब खराडे, महेश गव्हाणे, मृदुंगाचार्य महेश महाराज, रासपचे अजित पाटील उपस्थित होते. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान
संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्या हस्ते या दोन्हीही महंतांचा सन्मान करण्यात आला. सोहळयात योगदान देणाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी काल्याची दहीहंडी फोडण्यात येऊन सोहळ्याची सांगता हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. या सोहळयाच्या अन्नदानाच्या पवित्र कार्याला हातभार लावल्याबद्दल शिवसेना नेते रामदास गोल्हार व अनिलराव मते यांचा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...