आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बीची पेरणी:जिल्ह्यात 2 लाख 62 हजार हेक्टरवर झाली रब्बीची पेरणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे खरिप वाया गेल्याने रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ऊस वगळता २ लाख ६२ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. हे प्रमाण सरासरी पेरणी क्षेत्राच्या ६७.१७ टक्के असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४९८.८ मिमी असताना प्रत्यक्षात ७४५.७ मिमी पाऊस झाला. सरासरीच्या दिडपट झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके पाण्यात गेली. कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना या एकाच हंगामात बसला आहे.

अशा परिस्थितीत पीक पंचनाम्यानंतर नुकसानीपोटीची मदत मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप काहीच पदरात पडले नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. परतीच्या पावसामुळे नोव्हेंबरपर्यंत अनेक भागातील शेतात पाणी होते. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी विलंबानेच सुरू झाली. जिल्ह्याचे सरासरी रब्बीचे क्षेत्र ४ लाख ५८ हजार ६३५ आहे. त्यातुलनेत आतापर्यंत ६७ टक्के पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने ज्वारीची पेरणी १ लाख ३७ हजार ९९९ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

तर हरभरा ५७ हजार ९५३, गहू पेरणी ५३ हजार १२७ हेक्टरवर झाली. त्याखालोखाल मकाची पेरणी १३ हजार १२७ हेक्टरवर झाली आहे. उर्वरीत करडई, जवस, तीळ, सूर्यफूल पिकाची पेरणी किरकोळ क्षेत्रावर झाली. यंदा उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली, तसेच गावतळी व इतर सखल भागात अजूनही पाणी आहे. त्याचा फायदा विहिर बागायत क्षेत्राला होऊन, रब्बीत अधिक उत्पादनाची आशा आहे. शेतात साचलेला पाण्यामुळे वापसा मिळण्यास उशीर झाला. मागील आठवड्यापासून या भागात शेतीची मशागत करणे शक्य झाल्याने उर्वरीत पेरण्यांना गती आली आहे.

बातम्या आणखी आहेत...