आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘‘सर्वसामान्य जनतेला 600 रूपयांत घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे. राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवार 1 मे रोजी केले.
महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी विखे बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नायगांवचे सरपंच राजाराम राशीनकर, दीपक पठारे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, ‘‘बेकायदेशीर वाळू उत्खनातून महाराष्ट्रात वाळू माफियांचे साम्राज्य निर्माण झाले होते.अवैध वाळू विक्री वाढली होती. पर्यावरणाची हानी होत होती. यातून शासनाचा ही कोट्यवधीचा महसूल बुडत होता. यामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करुन देण्याकरीता वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला.’’
ते पुढे म्हणाले,‘‘कोवीड संकटानंतर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी, कष्टकरी मेटाकुटीला आला होता. सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले. शासनाने अतिवृष्टीच्या पावसाच्या निकषात बदल केला. एक रूपयात शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात येत आहे. जून अखेर अहमदनगर जिल्ह्यातील जमिनीची शंभर टक्के मोजणी करून घरपोच नकाशे दिले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यासाठी प्रत्येकी वीस लाख रूपये किंमतीचे 24 रोव्हर खरेदी करण्यात आले आहेत.’’ असेही विखे यांनी सांगितले.
विखे म्हणाले, ‘‘ 1 जूलै पासून जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना 15 दिवसांत जमीन मोजणी करून नकाशे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एकाच अर्जाद्वारे नऊ प्रकारचे दाखले दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील कृषी आराखड्यानुसार शेती पद्धतीत गांभीर्यपूर्वक मुलभूत बदल करण्याची गरज असल्याचे’’ मतही विखे यांनी यावेळी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने निर्भयपणे काम करावे. असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.