आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण:राहातेकरांचा बाप्पाला प्रेमपूर्वक निरोप; पारंपारिक मिरवणुका काढून ८९ मंडळांनी केले बाप्पांचे विसर्जन

राहाता24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायाच्या आगमनापासून निनादात सलग दहा दिवस वरूण राजाच्या मनसोक्त वर्षावात गणेश भक्तीचा भरपूर आनंद घेतल्यानंतर हे विघ्नहर्ता गणेशा करोना हटू दे, सर्वांना चांगले आरोग्य प्रदान करून आनंद दे, अशी प्रार्थना करीत छोटी - मोठी सार्वजनिक मंडळाच्या व घराघरात स्थापलेल्या गणेशमूर्तींचे वाजत गाजत मिरवणुकीने विसर्जन करून राहातेकरांनी बाप्पांना प्रेमपूर्वक निरोप दिला.

राहाता पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण ८९ गणपती बसवलेले होते. त्यापैकी काल ८४ गणेश उत्सव तसेच बाल उत्सव मंडळांनी विसर्जन केले. तर एक गाव एक गणपती ५ व खाजगी ५ गणेश उत्सव मंडळाचे विसर्जन झाले. आज राहिलेल्या ५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन होणार आहे.श्रीगणेशाच्या आगमनापासून राहाता शहर व तालुक्यात वरूणराजाच्या मनसोक्त वर्षावाने काही प्रमाणात नुकसान सोडले तर बळीराजा आनंदी झाला. राहाता परिसरात यंदा पावसाळ्यात जेवढा पाऊस झाला तेवढाच पाऊस गणेश उत्सवातील दहा दिवसांमध्ये झाला. पाटबंधारे विभागाच्या नोंदीनुसार ३० ऑगस्टपर्यंत ३८५ मिलिमीटर पावसाची नोंद राहाता परिसरात झाली. तर ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत ६९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गणेश उत्सवाच्या दहा दिवसात सुमारे ३०८ मिलिमीटर ढगफुटी प्रमाणे पाऊस झाला आहे. गणपतीच्या १० दिवस पाऊस असल्यामुळे कुठल्याही मंडळांनी देखावे व आरास केली नाही. भर पावसात राहाता परिसरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूजा, आरती करीत गणेशाची प्रार्थना केली. शहरातील शनी चौक गणेश मंडळाने आठव्या दिवशी तर त्रिशूल मित्र मंडळाने नवव्या दिवशी श्रीगणेश मूर्तींचे चक्क पावसात डीजेच्या तालावर युवकांनी नाचत आनंद घेत विसर्जन केले.

सकाळी ९ वा. पासून दिवसभर घरगुती व सार्वजनिक मंडळांनी गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन केले. नगर परिषदेने शहरातून ट्रॅक्टर फेरी काढून अनेक घरातील छोट्या गणेश मूर्ती जमा करून त्यांचे शहरातील साठवण तलावामध्ये विसर्जन केले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
ग्रामदैवत वीरभद्र देवस्थान ट्रस्टची गणेश मूर्ती आकर्षक रथातून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वीरभद्र क्रीडा मंडळाची गणेश मूर्ती सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणुक काढण्यात आली. बैलगाडीतील गणरायांबरोबर अनेक भाविकांनी सेल्फीचा आनंद घेतला. माळीनगरचा राजा या मंडळाने रात्री १० वाजेनंतर सर्वात शेवटी गणेश विसर्जन केले. राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवल्याने शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत गणेश मूर्तींचे विसर्जन झाले.

बातम्या आणखी आहेत...