आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारनेर:अण्णांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीची बिनविरोध परंपरा पुन्हा सुरू, असे असेल जागावाटप

पारनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राळेगणसिद्धी ग्रामस्थांच्या निर्णयावर अण्णा हजारेंनी केले शिक्कामोर्तब

ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त होणारे वाद, कटुता टाळण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये एकमत झाले. या निर्णयामुळे पंधरा वर्षांपूर्वी खंडित झालेली बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय राळेगणसिद्धी येथील विविध राजकीय गटांनी घेतला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गावातील तरुण राजकीय कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर शनिवारी शिक्कामोर्तब केले.

आमदार नीलेश लंके यांनी ‘ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा व गावाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी मिळवा’ असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, उद्योजक सुरेश पठारे, माजी उपसरपंच लाभेश औटी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता आवारी यांंनी आमदार लंके यांची सुपे येथे भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर एकमत झाले. या बैठकीतील निर्णयाची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात आली.

पन्नास वर्षांपूर्वी हजारे यांच्या नेतृत्वाखाली राळेगणसिद्धी येथे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार सात वेळा, पस्तीस वर्षे राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत होती‌. २००४ मध्ये मात्र बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा खंडित झाली. आता पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू करण्याचा निर्णय राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी घेतला आहे.

असे असेल जागावाटप
राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य आहेत. त्यापैकी चार सदस्य उद्योजक सुरेश पठारे व माजी उपसरपंच लाभेश औटी यांच्या गटाचे असतील. सुरुवातीची दोन वर्षे या गटाकडे सरपंचपद असेल, तर माजी सरपंच जयसिंग मापारी यांच्या गटाचे पाच सदस्य असतील. तीन वर्षे मापारी गटाकडे सरपंचपद असेल, असा समझोता झाला. दरम्यान, राळेगणसिद्धीचा हा ट्रेंड राज्यात कोणी अमलात आणेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, असे असले तरी राजकीय पक्ष मात्र चढाओढीने राजकारण करत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. शिवसेनेने तर राज्यात कुठल्याही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करू नये, असे आपल्या जिल्हाप्रमुखांना बजावले आहे.

‘ब्रँड अॅम्बेसेडर’चे काम करू
ग्रामपंचायत निवडणूक हा ग्रामविकासातील मोठा अडसर आहे. निवडणुकीनिमित्त वाद होतात. कटुता निर्माण होते. त्याचा परिणाम गावाचा विकास खुंटण्यावर होतो. आमदार लंके यांचे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आपण ब्रँड अॅम्बेसेडर (विशेष दूत) म्हणून काम करण्यास तयार आहोत. अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser