आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलअभियंत्यांच्या प्रश्नावर सभेत सारेच निरुत्तर:नगरची पाणी वितरण व्यवस्था रामभरोसे च; मनपा प्रशासनाची स्थायी समितीच्या सभेत जाहीर कबुली

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहराची पाणी वितरण व्यवस्था ‘रामभरोसे’ असल्याची कबुली महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या सभेत दिली. नगरसेवक गणेश कवडे यांनी विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून जाब विचारताच जल अभियंता परिमल निकम यांनी अपुरे मनुष्यबळ व अपुऱ्या यंत्रणेची माहिती देत अशा परिस्थितीत तुम्ही जाब कसा विचारता असा प्रतिसवाल केला. यावर पदाधिकारी व सदस्यही निरुत्तर झाले.

सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी स्थायी समितीची सभा पार पडली. यात नगरसेवक कवडे व प्रशांत गायकवाड यांनी प्रभागातील पाण्याच्या समस्येवरून सवाल उपस्थित केला. धरणात शंभर टक्के पाणीसाठा असूनही पाणी मिळत नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. नगरसेवकांना दररोज नागरिकांच्या या प्रश्नाला सामोरे जावे लागते. आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातही पाणीपुरवठा खंडित होतो. वर्षभरात जेमतेम शंभर ते सव्वाशे दिवसच पाणी मिळते. शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, असे नगरसेवक कवडे यांनी निदर्शनास आणले.

जला अभियंता निकम यांनी या संदर्भात माहिती देताना एक ट्रांसफार्मर बंद असल्याने पाच ऐवजी चार मोटारींवरच पाणी उपसा सुरू असल्याचे सांगितले. तसेच विभागातील अभियंता सदाशिव रोहकले यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली. त्यांच्या जागेवर अद्यापही अभियंता नियुक्त झालेला नाही. पाणी पुरवठ्याचे नियोजन, वॉलमनचे नियोजन, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. अपुरे मनुष्यबळ व अपुरी यंत्रणा असताना आपण जाब कसा विचारू शकता, असा प्रतिसवाल निकम यांनी केला. त्यावर सारेच निरुत्तर झाले कवडे यांनी सभापती वाकळे यांचे याकडे लक्ष वेधत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. सभापती वाकळे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घ्यावा व त्यांना कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश आस्थापना विभागाला दिले.

शहरात बारा मीटरचे रस्ते चार मीटर झाले, अतिक्रमण विभाग काय करतो?
अतिक्रमणांच्या मुद्यावरून स्थायी समितीत संताप व्यक्त करण्यात आला. अतिक्रमण विभाग काय करतो, असा सवाल सभापती कुमारसिंह वाकळे व विनित पाऊबुध्दे यांनी केला. शहरात बारा मीटरचे रस्ते चार मीटर झाले आहेत, असा आरोप वाकळे यांनी केला. या अतिक्रमणांकडे किती दिवस दुर्लक्ष करणार, असा सवाल करत इमारतीसमोरील पत्र्याचे शेड, दुकानासमोरील जाळ्या तसेच रस्त्यांवर बसणारे विक्रेते यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश वाकळे यांनी दिले. तसेच मनपाच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांनी खूप तक्रारी आहेत. परंतु मनुष्यबळ नसल्याचे सांगितले. त्यावर नियोजन करून कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

ॲनिमल वेस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करा
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक मुदस्सर शेख यांनी जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ तसेच कोठला चौक परिसरात महामार्गाच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या ॲनिमल वेस्टचा मुद्दा उपस्थित केला. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ॲनिमल वेस्ट आणून टाकले जात आहे. बोल्हेगाव परिसरातही अशीच परिस्थिती आहे, असे सभापती वाकळे यांनी निदर्शनास आणले. तर कल्याण रोडवरही असाच प्रकार सुरू झाल्याचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी सांगितले. ॲनिमल वेस्ट इतरत्र टाकणाऱ्यांवर मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई करावी, प्रसंगी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशा सूचना वाकळे यांनी केल्या.

बातम्या आणखी आहेत...