आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रासप स्वबळावर लढवणार

नेवासेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वबळावर लढवणार अाहे. विधानसभा निवडणुकीत संतोष काळे हेच रासपचे नेवासे मतदार संघातील उमेदवार असतील, असे प्रतिपादन रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी पत्रकार परिषदेत केले. नेवासे तालुक्यातील वाकडी येथे बोलताना रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकाला सत्तेच्या प्रक्रियेत सहभाग मिळाला पाहिजे. त्यासाठी समाज प्रबोधन करण्याचे काम आमचे राज्यभर सुरू आहे. येणाऱ्या काळात सर्वसामान्य माणसांना सत्तेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी रासप येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपशी आमची युती आहे.

मात्र मागच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रासपला जागा सोडण्याबाबत त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व आगामी लोकसभेच्या ४८, तर विधानसभेच्या २८८ जागांवर देखील स्वबळावर निवडणुका लढविण्याचा आमचा निर्धार असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांची बांधणी राज्यभर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आताच्या घडीला सर्वच पक्ष हे प्रस्थापितांचे पक्ष असून निवडणुका स्वबळावर लढवून सर्वसामान्य माणूस सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे म्हणून आज सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करत आहे.

आमच्या अजेंड्यावर महत्त्वाचे बारा विषय असून सर्व जाती धर्माच्या लोकांची जनगणना ही त्यांच्या लोकसंख्येनुसार झाली पाहिजे. त्यांना सर्व क्षेत्रात भागीदारी मिळाली पाहिजे. ओबीसीना व सर्व जातींना आरक्षण देखील कायम झाले पाहिजे. सर्व लोकांना आरोग्य सेवा ही मोफत मिळाली पाहिजे. उच्च शिक्षण देखील सर्वसामान्य माणसाच्या मुलांना मोफत मिळाले पाहिजे याचा समावेश अजेंड्यात असून आमची सत्ता आली, तर या सर्व गोष्टी आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी नेवासे तालुक्याचे रासप नेते संतोष काळे म्हणाले, पक्ष जो आदेश देईल त्यादृष्टीने माझी काम करण्याची तयारी आहे. पक्षाने संधी दिल्यास मी विधानसभा निवडणूक लढेन. शेतकरी बचत गट स्थापन करून ठिकठिकाणी गुऱ्हाळे सुरू करून अतिरिक्त उसाच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी रासपचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश सदस्य डॉ. प्रल्हाद पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य सय्यद बाबा शेख, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, औरंगाबाद खंडपीठाचे सरकारी वकील अॅड. ज्ञानेश्वर काळे, नगर जिल्हाध्यक्ष नानभाऊ जुंधारे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी, मार्गदर्शक रावसाहेब काळे, संतुबाबा गायकवाड, अॅड. अंजली काळे, शेतकरी आघाडीचे नानासाहेब जगताप, जिल्हा सचिव दत्तात्रय कचरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...