आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:रिझर्व्ह बँकेने ‘नगर अर्बन’वरील निर्बंध आणखी तीन महिने वाढवले

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेच्या कारभारावर भारतीय रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी घातलेले निर्बंध आता आणखी तीन महिने वाढवले आहेत. येत्या ६ सप्टेंबरपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. निर्बंध कायम करताना ठेवीदार व खातेदारांना कोणत्याच सवलती न दिल्यामुळे ठेवीदार, खातेदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सव्वा दोन वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनुसार केंद्रीय सहकार निबंधकांनी राज्याच्या सहकार खात्याद्वारे मागील वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये नगर अर्बन बँकेची निवडणूक घेतली. सत्ताधाऱ्यांनी १ डिसेंबरला सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या सहा दिवसातच नगर अर्बन बँकेच्या कामकाजावर निर्बंध जारी झाले. सहा महिन्यांसाठीचे हे निर्बंध ६ जूनपर्यंत होते. मात्र, हे सर्व निर्बंध येत्या तीन महिन्यांसाठी कायम ठेवले आहेत. त्यामुळे बँकेचा कारभार सु़धारण्यासाठी आणि थकीत कर्ज वसुली प्राधान्याने करण्यासाठी विद्यमान संचालकांना शेवटची संधी असल्याचे जात आहे. दरम्यान, अनेक ठेवीदारांना दुसऱ्या टप्प्यातील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींचे पैसे अद्यापही परत मिळालेले नाहीत.

संचालकांनी राजीनामे द्यावेत : राजेंद्र गांधी
निर्बंध आणखी तीन महिन्यांसाठी वाढवल्याने याबाबत नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी विद्यमान संचालक मंडळाने तातडीने राजीनामा देण्याची मागणी केली आहे. नव्या आदेशात ठेवीदार व खातेदारांसाठी कोणतीही सवलत नसल्याने हे संचालक मंडळाचे अपयश आहे. थकबाकी वसुलीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या सर्व अपयशाची जबाबदारी घेवून सर्व संचालकांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...