आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी मंगळवारी (ता. २) सर्वपक्षीय ग्रामस्थांची बैठक घेऊन महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. त्यात आरती पासचा काळाबाजार रोखण्यासाठी यापुढे कोणाचीही शिफारस चालणार नाही. साईसंस्थान कर्मचारी व ग्रामस्थांनाही आता साईदर्शनासाठी कडक नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. साईभक्तांसह ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
साईबाबा संस्थान व ग्रामस्थांमध्ये प्रशासन बैठकीत दर्शन व आरतीसाठी विविध नियमावलीबाबत चर्चा करण्यात आली. यात साई समाधी मंदिरात जनसंपर्क कार्यालय, सुरक्षारक्षक, मंदिर कार्यालय व संपूर्ण परिसरात गेट नं. १, २, ३, ४ व ५ या ठिकाणी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणताही कर्मचारी मोबाईल वापरू शकत नाही, आजवर आरतीसाठी मिळणारे सशुल्क पासेससाठी शिफारस सक्तीची होती, मात्र आता ती हटविण्यात आली आहे. द्वारकामाई, गुरुस्थान, समाधी मंदिर या सर्व ठिकाणचे बॅरिगेटस् हटविण्यात आले आहेत. ग्रामस्थांसाठी गेट नं. ३ हे गावकरी दर्शन प्रवेश गेट असणार आहे, मात्र या ठिकाणी फक्त शिर्डी ग्रामस्थांना प्रवेश असेल. प्रत्येकाचे ओळखपत्र तपासूनच प्रवेश देऊन त्याची नोंद ठेवण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, कोणत्याही गेटने प्रवेश करून कोणीही आपले नातेवाईक, मित्र व अन्य व्हीआयपी विनापास प्रवेश केल्यास त्या ठिकाणी तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोणताही ग्रामस्थ विना पास प्रवेश करून आपल्यासोबत असणाऱ्या लोकांना विनापास दर्शनाचा आग्रह करीत असेल, तर त्याच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार साई संस्थान प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याची त्वरित अंमलबजावणी बुधवारपासून (ता. ३) लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती राहुल जाधव यांनी माध्यमांना दिली. ही नियमावली सर्वांसाठी एकसारखी असणार आहे. या निर्णयामुळे अनेक अपप्रवृत्तीला चाप बसणार आहे.
दर्शनाचा काळाबाजार, व्हीआयपी सशुल्क पासेसचा गोरखधंदा व फुकट दर्शन घडवून आणून, दररोजची कमाई करणाऱ्या टोळ्यांवर व त्यात सामील असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची संक्रात आली आहे. राहुल जाधव यांच्या धाडसी निर्णयामुळे साई संस्थानमधील नियम धाब्यावर बसवणारे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाधव यांची धास्ती घेतली आहे. या निर्णयामुळे शिर्डी ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांवरही अंकुश आला असून, संस्थांनच्या कारभारात नक्कीच पारदर्शकता येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
लवकरच नवीन दर्शनरांग
नवीन दर्शनरांग लवकरच सुरू होणार असून, त्यात काही सूचना आल्या आहेत. त्यावर अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन प्रत्येक भाविकांचे शांत, सुलभ व सुरक्षित दर्शन कसे होईल, यावर भर दिला जाणार आहे. यासाठी त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लागुडडा, जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्यानेच हे निर्णय होऊ शकल्याचे जाधव यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.