आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृत अभियानाअंतर्गत महानगरपालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम महाऊर्जामार्फत सुरू आहे. मात्र, कामाची मुदत संपून अडीच वर्षे लोटली, तरी केवळ दोनच ठिकाणी प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. महापौर रोहिणी शेंडगे यांनी ठेका रद्द करून नवीन संस्थेला काम देण्याचे आदेश दिले होते. आता नगर विकास विभागाकडूनही काम रखडल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात आयुक्त पंकज जावळे यांनी महाऊर्जाच्या महासंचालकांना पत्र दिले आहे.
१.६ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाचे काम महाऊर्जामार्फत खासगी संस्थेला देण्यात आले होते. त्याच्या कामापोटी ५ कोटी ९१ लाख ३१ हजार ९७३ रुपये महाऊर्जाकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत. ३१ मे २०२० रोजी मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, या कालावधीत एजन्सीमार्फत कुठलीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा ३१ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही एजन्सीने काम सुरू केलेले नव्हते.
मागील वर्षी काम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत विळद व नागापूर येथे प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. मात्र, इतर सहा ठिकाणी प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये महापौर शेंडगे यांनी प्रिमियर सोलर सिस्टीम प्रा. लि. यांना काम करण्याची इच्छा नसून त्यांना मुदतवाढ न देता कार्यारंभ आदेश रद्द करावा व नव्याने निविदा प्रसिध्द करण्याबाबत विभागीय व्यवस्थापकांना (महाऊर्जा) आदेश दिले होते. त्यानंतरही सद्यस्थितीत आठ प्रकल्पांपैकी फक्त दोनच प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. वेळोवेळी मुदतवाढ देवूनही ठेकेदाराने काम पूर्ण केले नसल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ठेकेदारास आदेश द्यावेत व नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.