आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सेवा:‘आनंदऋषीजी’त मार्च महिन्यात विक्रमी 1572 यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया, स्थापनेपासून 40 हजार 171 नेत्र शस्त्रक्रिया करून रुग्णांच्या जीवनात प्रकाश

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्दोष दृष्टी ही प्रत्येकाची गरज असते. हीच बाब लक्षात घेऊन जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत आनंदऋषीजी नेत्रालय भरीव कार्य करीत आहे. मार्च २०२२ या एकाच महिन्यात १५७२ यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करण्याचा विक्रम नेत्रालयाने केला. स्थापनेपासून डिसेंबर २०१७ ते मार्च २०२२ अखेर नेत्रालयाने ४० हजार १९१ नेत्रशस्त्रक्रिया करून रुग्णांच्या जीवनात नवा प्रकाश आणण्याचे काम केले, अशी माहिती प्रशासनाधिकारी आनंद छाजेड यांनी दिली.

विश्वास, परंपरा आणि तंत्रज्ञान याचा त्रिवेणी संगम असलेले आनंदऋषीजी नेत्रालय आनंदऋषीजी हॉस्पिटल शेजारील महावीर भवन येथे कार्यरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर येथील वैशिष्ट्‌य आहे. हायटेक ऑपरेशन थिएटर, पोस्ट ऑपरेशन केअर, तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम येथे कार्यरत आहे. मोतीबिंदूमुळे कोणालाही न दिसण्याचा त्रास होऊ नये यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली सेवा देण्याचा नेत्रालयाचा प्रयत्न असतो. त्यामुळे नगरसह बीड जिल्ह्यात वेळोवेळी मोफत नेत्रतपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येते. ग्रामीण भागातून रुग्णांना नगरला आणण्यासाठीही स्वतंत्र गाडीची व्यवस्था आहे. येथे त्यांची सर्व सोय केली जाते. नेत्रालयाचे नगर जिल्ह्यातील तालुक्यांसह बीड जिल्ह्यात मिळून १५ व्हिजन सेंटर कार्यरत आहे. आगामी काळात असे ३५ व्हिजन सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यात उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांचाही समावेश असणार आहे. वैद्यकीय अधीक्षक नेत्रतज्ज्ञ डॉ. अशोक महाडीक यांच्यासह १० अनुभवी नेत्रतज्ज्ञांची टिम असल्याने रेटीनासह डोळ्यांच्या किचकट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या केल्या जातात. आगामी पाच वर्षात नगर, बीड जिल्ह्यात एकही मोतीबिंदू असलेला रुग्ण शस्त्रक्रियेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे लक्ष्य ठेवण्यात आले. याअंतर्गत दररोज १०० नेत्रशस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. समाजाची गरज आणि सेवाभाव हा मंत्र जपत आनंदऋषीजी नेत्रालय सेवा देत आहे. शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत टेरिजियम (पडदा), मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, रेटिना (मागचा पडदा) निसटणे शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. याशिवाय लहान मुलांमधील मोतीबिंदू, तिरळेपणा, अपघाती मार लागणे, डोळ्यांतील मास वाढणे, रेटिना इंजेक्शन आदी समस्यांवरही येथे उपचार केले जातात. आतापर्यंत १५० रेटिना शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. १०० हून अधिक मुलांच्या मोतीबिंदू व स्क्विंट शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात सर्व डॉक्टर, स्टाफने मोलाची भूमिका बजावल्याचे छाजेड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...