आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाचे गाळप:राज्यात उसाचे विक्रमी गाळप, महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी, महाराष्ट्र ब्राझीलनंतर दुसऱ्या स्थानी, 13 कोटी 19 लाख टन उसाचे गाळप

अहमदनगर | गणेश देलमाडे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालू गळीत हंगामात राज्यातील १०१ सहकारी व ९८ खासगी कारखान्यांनी ९ जूनअखेर १३ कोटी १९ लाख ८२ हजार टन उसाचे विक्रमी गाळप करून १३ कोटी ७२ लाख २३ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली. राज्याचा साखर उतारा १०.४० एवढा आला. मागील हंगामापेक्षा या हंगामात ३ कोटी ६ लाख टन जास्त गाळप झाले. राज्यातील १९९ पैकी १८८ कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झाला असून सध्या १० कारखाने सुरू आहेत. राज्यातील हे विक्रमी गाळप असून ऊस गाळपात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

देशात एकूण ५ कोटी, राज्यात ४० लाख शेतकरी उसाची शेती करतात. चालू हंगामात महाराष्ट्रामध्ये १३ लाख ६७ हजार क्षेत्र उसाखालील होते, तर १३ कोटी २० लाख टन ऊस उपलब्ध होता. कोल्हापूर विभागाने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. कोल्हापूरच्या ३६ कारखान्यांनी २ कोटी ५४ लाख ६९ हजार टनाचे गाळप करून ३ कोटी ४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. राज्यातील सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूरने ११.८० टक्के मिळवला. पुणे विभागातील ३० कारखान्यांनी २६९.८७ लाख टन गाळपासह २ कोटी ९१ लाख २९ हजार क्विंटल साखर निर्मिती केली. सोलापूरच्या ४७ कारखान्यांनी ३ कोटी ६३ लाख टन गाळप करून २ कोटी ८४ लाख २६ हजार क्विंटल साखर उत्पादित केली. अहमदनगर विभागातील २८ कारखान्यांनी २ कोटी २९ लाख टन गाळप करून २ कोटी ६० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद विभागातील २४ कारखान्यांनी १ कोटी ३२ लाख ८० हजार टन गाळप करून १ कोटी २९ लाख २६ हजार क्विंटल साखर निर्मिती केली. नांदेड विभागातील २७ कारखान्यांनी १ कोटी ४६ लाख ९६ हजार टनाचे गाळप करून १ कोटी ५२ लाख ९२ हजार क्विंटल साखर उत्पादित केली. अमरावतीतील ३ कारखान्यांनी १० लाख ३ हजार टन गाळप करून ९ लाख ६७ हजार क्विंटल साखर उत्पादित केली. नागपूरमध्ये ४ कारखान्यांनी ४ लाख ५५ हजार टन गाळप करून ३ लाख ८२ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली. सर्वाधिक गाळप सोलापूरात विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने २४ लाख ७८ हजार ९२२ टन गाळप केले.

१३७२.९५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
कोल्हापूर आघाडीवर : साखर उताऱ्यामध्ये कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे. कोल्हापूरचा साखर उतारा ११.८० टक्के मिळाला. पुणे १०.७९, नांदेड १०.४१, तर अहमदनगरचा उतारा १०.०२ एवढा आला.

दरवर्षी का होतेय वाढ? समाधानकारक पाऊस व ठिबक सिंचनाखाली होत असलेली लागवड यामुळे राज्यातील उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.

राज्यातील गाळप दृष्टिक्षेपात (वर्ष २०२१-२२)
199 एकूण कारखाने
101 सहकारी कारखाने
98 खासगी कारखाने
694.86 लाख टन उसाचे सहकारी कारखान्यांचे गाळप
746.36 लाख क्विंटल सहकारीची साखर निर्मिती
624.96 लाख टन उसाचे खासगी कारखान्यांचे गाळप
625.87 लाख क्विंटल खासगी कारखान्यांची साखर निर्मिती
२०२०-२१ मधील राज्यातील गाळप व साखर निर्मिती
1013.64 लाख टन उसाचे गाळप
1064.08 लाख क्विंटल साखर उत्पादन

शंभर वर्षांतील विक्रमी गाळप शंभर वर्षांतील सर्वाधिक
^चालू गळीत हंगामात महाराष्ट्रामध्ये मागील शंभर वर्षांतील सर्वाधिक गाळप झाले आहे. ऊस गाळपात महाराष्ट्र देशात एक नंबरवर आहे, तर ब्राझीलनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. राज्यातील साखर निर्यातीतही वाढ झाली आहे. भारताच्या साखर उद्योगाची उलाढाल सुमारे २.५ लाख कोटी, तर महाराष्ट्रची उलाढाल १ लाख कोटी आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.

बातम्या आणखी आहेत...