आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा सहकारी बँकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यावर बँकेच्या सभागृहात स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेस अभिवादन करून नवे अध्यक्ष व भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पदभार स्वीकारला. पहिल्या टप्प्यात बँकेतील ७०० रिक्त जागांची भरती करण्याची घोषणाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. याबाबत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवला आहे व ही भरती शासनाद्वारे होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष कर्डिले यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी संचालक अण्णासाहेब म्हस्के, सीताराम गायकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्रशांत गायकवाड, संचालिका अनुराधा नागवडे, अमित भांगरे, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, माजी संचालक संपत म्हस्के, रावसाहेब पाटील शेळके, दत्तात्रय पानसरे तसेच बाळासाहेब साळुंके, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, मीनाक्षीताई पठारे, सुरेश पठारे आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या सुमारे बाराशेवर जागा रिक्त आहेत. राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आता ग्राहकांच्या दारात जात आहेत. या तुलनेत जिल्हा बँकेच्या जिल्हाभर शाखा असल्या तरी पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे शेतकरी सभासदांना विविध सेवा देण्यास अडचणी येतात. म्हणून पहिल्या टप्प्यात ७०० जागा व दुसर्या टप्प्यात ५०० जागा भरण्याचे नियोजन आहे.
राज्य सरकारच्या यंत्रणेद्वारे ही भरती करण्याचा प्रयत्न आहे व तशी झाली नाहीतर बँकेद्वारे पारदर्शीपणे केली जाईल व या भरतीमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे अध्यक्ष कर्डिले यांनी जाहीर केले. जिल्ह्यात १४ साखर कारखाने आहेत व मी कारखानदार जरी नसलो तरी हे सर्व कारखाने सुरळीत चालावे यासाठी माझे नेहमी प्रयत्न राहिले आहेत. कारखान्यांच्या मदतीबाबत बँकेच्या संचालक मंडळात काही मतभेद झाले, पण मी पुढाकार घेऊन मदत केली म्हणून मी बँकेचा अध्यक्ष झालो, असे सूचक भाष्यही त्यांनी अगस्ती कारखान्याच्या मदत निर्णयाच्या अनुषंगाने केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.