आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात गावरान कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून या कांद्याला प्रतिक्विंटल १ हजार ६०० रूपयांचा भाव शनिवारी मिळाला. लाल कांद्याला मात्र, २ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. कांदा बियाणे कंपन्यांकडून कांदा खरेदी झाल्यास या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील बहुतांश कांद्याचे नुकसान झाले. परंतु, पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत अत्यल्प प्रमाणात खरिपाचा कांदा तग धरून राहिला. मागील वर्षी चाळीत साठवलेला गावरान कांदा अजूनही बाजार समित्यांत आणला जात आहे. परंतु, आठवडाभरापासून दाखल होत असलेल्या लाल कांद्याला २ हजार ७०० चा भाव वांबोरी उपबाजारात मिळाला.
वांबोरीत १३ हजार ७३७ कांदा गोण्याची आवक झाली होती, एक नंबरचा गावरान कांदा १ हजार २०५ ते १ हजार ६०० रूपये, दोन नंबर कांदा ८०५ ते १ हजार २०० रूपये तर तीन नंबरचा कांदा १०० ते ८०० रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला ५०० ते ८०० रूपयांचा भाव मिळाला. अपवादात्मक २८ कांदा गोण्यांना २ हजार रूपये भाव मिळाला. पाथर्डी तालुक्यातून दाखल झालेल्या ३१६ गोणी कांद्याला मात्र, ४०० ते २७०० पर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कांदा बियाणे कंपन्यांकडून खरेदी झाल्यास, भाव तात्पुरते चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.
बाजरी पुन्हा घसरली दोन दिवसांपूर्वी भुसार मालाच्या मोंढ्यावर बाजरीला प्रतिक्विंटल ३ हजारांचा भाव मिळाला होता. शनिवारी मात्र, त्यात घसरण होऊन प्रतिक्विंटल १ हजार ९०१ रूपये दराने बाजरी विकली गेली. गहू २३०१ ते २४०२ रूपये तर सोयाबीनला ५२०१ ते ५४५१ रूपयांचा भाव मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.