आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. बोठे याची गेल्या पाच दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे. गुरुवारी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून पोलिसांनी स्पॉट व्हिजिटिंगद्वारे तपास केला. दरम्यान, या गुन्ह्याचा खटला लढण्यासाठी नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव हेदेखील गुरुवारी सायंकाळी नगरमध्ये दाखल झालेे आहेत.
रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बोठे याला गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणीसाठी नेले होते. त्याचा जप्त केलेला मोबाइल हा उघडण्यासाठी सायबर विभागाच्या एका टीमला पाचारण केले आहे. तो फोन कशा पद्धतीने उघडला जातो यासाठी पोलिस प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे याच घटनेतील आरोपी महेश तनपुरेकडे असलेले त्याचे फोन फॉरेन्सिक लॅबकडे पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. या गुन्ह्यात नाव जाहीर झाल्यापासून बोठे पसार झाला होता. तब्बल साडेतीन महिन्यांनंतर त्याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोठडीत रवानगी होताच पहिल्याच दिवशी पोलिसांनी बोठेची चौकशी सुरू केली. मात्र, तो अद्याप तोंड उघडण्यास तयार नाही. फरार झाल्यानंतर त्याच्या घरातून हस्तगत केलेल्या आयफोनचा पासवर्ड देखील विसरलो असल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.
अधिक माहिती समोर येणार : तपासी अधिकारी अजित पाटील, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील बोठेची चौकशी केली. बोठेचा आयफोन उघडण्यासाठी नगर पोलिसांना सायबर पोलिसांचे विशेष पथक बोलवावे लागले. आयफोन उघडल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. याकडे आता नगर जिल्ह्यासह अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
तांत्रिक तपासावर पोलिसांचा भर
हैदराबादमध्ये बोठे जो मोबाइल फोन वापरत होता, तो कुणाचा आहे याची माहिती पोलिसांनी मागवलेली आहे. याच गुन्ह्यात हैदराबाद येथील अटकेत असलेला वकील जनार्दन अकुला याच्या नावाने हा फोन घेतला असावा. त्या दृष्टिकोनातून सर्व माहिती पोलिसांनी मागवलेली आहे. तसेच तो त्या ठिकाणी वास्तव्यास केव्हापासून होता. त्याने मध्यंतरीच्या काळामध्ये कोणाकोणाची मदत घेतली, याचासुद्धा पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. फरार झाल्यानंतर तो त्याच्या घरच्यांशी संपर्कासाठी महेश तनपुरे यांच्या मोबाइलवरून संपर्कात होता. तनपुरे याच्या घरातून हस्तगत केलेले मोबाइल पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. त्यामुळे या फोनमध्ये बोठे याने काय पुरावे ठेवले आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहणार आहे. या फोनचे जर लॉक उघडले तर पोलिसांचा तपास हा आणखी सुकर होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.