आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीच्या बातमीची दखल:3 कोटी खर्चून शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात ‘रिलायन्स’ उभारणार ऑक्सिजन प्लँट, आरटीपीसीआर लॅब

शिर्डी / नवनाथ दिघे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी - Divya Marathi
कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी
  • 15 दिवसांत साकारणार प्रकल्प, नीता व अनंत अंबानी यांनी साधला संस्थानशी संपर्क

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्यात अनेक कोरोना रुग्ण दम तोडत आहेत. त्यामुळे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पाचशे- सहाशे रुग्णांना पुरेल एवढ्या क्षमतेचा ऑक्सिजन प्लँट निर्मितीचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या विश्वस्त मंडळ नसल्याने तदर्थ समिती आणि उच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतरच या कामाला प्रारंभ होणार असल्याने त्यासाठी विलंबही लागण्याची शक्यता होती. ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेली ही बातमी थेट अंबानी परिवारापर्यंत पोहोचली. नीता अंबानींचे चिरंजीव अनंत यांनी थेट बगाटे यांच्याशी संपर्क साधत ‘दिव्य मराठी‘तील बातमीचा संदर्भ देत आढावा घेतला. सद्य:स्थिती पाहता येत्या दहा-बारा दिवसांत रिलायन्स समूह संस्थानच्या साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सुमारे २ कोटी खर्चाचा ऑक्सिजन प्लँट व १ कोटी खर्च असलेली आरटीपीसीआर तपासणीची अद्ययावत लॅबची निर्मिती करून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर बगाटे यांनी तातडीने ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधत ही माहिती दिली.

कोरोना रुग्णांसाठी संस्थानकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साई आश्रमात अद्ययावत कोविड सेंटर करून तेथे सर्व सुविधा दिल्या आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोविड सेंटर कमी पडू लागल्याने साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालय व साईनाथ रुग्णालयात ५०० बेडची उपलब्धता करून देण्यात आली. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने संस्थानने हा प्लँट, आरटीपीसीआर लॅबच्या निर्मितीचा प्रस्ताव दिला. अंबानी परिवाराने पुढाकार घेतल्यानंतर रिलायन्स समन्वयक गिरीश वशी संस्थानच्या संपर्कात असून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काम पाहत आहेत.

‘दिव्य मराठी’तील बातमीनंतर अंबानींचा थेट संपर्क
हा प्लँट व लॅबबाबत ‘दिव्य मराठी’त बातमी आल्यानंतर नीता व त्यांचे चिरंजीव अनंत यांनी माझ्याशी मसुरी येथे संपर्क साधला. माहिती घेऊन प्रस्तावित प्लँट व लॅब रिलायन्स समूह करून देत असल्याचे सांगितले. दहा-पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होईल. या निर्णयात रिलायन्सचे समन्वयक गिरीश वशी यांचे मोठे सहकार्य मिळाले. - कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी

अंबानी परिवाराकडून संस्थानला विविध देणग्या
अंबानी कुटुंबीय साईभक्त असून नीता व त्यांचा मुलगा अनंत नियमितपणे शिर्डीत साई दर्शनाला येतात. प्रत्येक वेळी साई संस्थानला विविध स्वरूपात देणग्या रिलायन्स समूहाकडून देण्यात आल्या आहेत. आता कोरोनाच्या संकटात हे कुटुंब संस्थानच्या मदतकार्यात धाऊन आल्याने कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...