आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रामनवमीनिमित्त शिर्डीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, यंदाच्या उत्सवात भाविकांच्या गर्दीचे साई संस्थानकडून नियोजन केल्याची सीईओ बानायत यांची माहिती

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री साईबाबा संस्थ‍ानच्या वतीने शनिवारी (दि. ९ एप्रिल)ते सोमवार (दि. ११ एप्रिल) दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

श्रीराम नवमी उत्सवाची सुरुवात १९११ मध्ये श्री साई बाबांच्या अनुमतीने करण्यात आली. तेव्हापासून प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात शिर्डी येथे उत्सव साजरा केला जातो. उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी यासाठी उन्हापासून संरक्षणासाठी मंदिर परिसर, नवीन पिंपळवाडी रोड, गेट नं. ४ ते द्वारकामाई व चावडी परिसर, साई उद्यान आणि श्री साई प्रसादालय या ठिकाणी ९७ हजार चौरस फुटांचे मंडप उभारले आहेत. साईभक्तांच्या निवास व्यवस्थेसाठी भक्त निवास व साई धर्मशाळा याठिकाणी सुमारे ३२ हजार चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. यात वीज, पाणी, स्वच्छतागृह व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबई परिसरातून येणाऱ्या पदयात्रींची निवासाची सोय होण्यासाठी संस्थानतर्फे मुंबई ते शिर्डी मार्गावर ठिकठिकाणी १ लाख १७ हजार चौरस फूट मंडप उभारण्यात आला आहे. यात वीज, पाण्याची सोय केली आहे.

श्री रामनवमी उत्‍सवानिमित्त शनिवारी (दि. ९) पहाटे सव्वापाचला काकड आरती, पहाटे पावणे सहा वाजता श्रींचा फोटो, पोथीची मिरवणूक, सकाळी सहा वा. द्वारकामाईत श्री साईसच्चरित्राचे अखंड पारायण, ६.२० वाजता मंगलस्नान व दर्शन, दुपारी साडेबाराला मध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद वाटप होईल. दुपारी ४ ते ६ या काळात समाधी मंदिर स्टेजवर विक्रम नांदेडकर यांचे कीर्तन होईल. सायंकाळी साडेसहाला धूपारती, सायंकाळी साडेसात ते रात्री १० या वेळेत निनाद ग्रुपच्या पद्मावती पारेकर (पुणे) यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होईल. रात्री सव्वानऊला श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. रात्री १० वाजता शेजारती होईल. पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे. १० एप्रिलला नित्याची शेजारती, ११ एप्रिलला पहाटेची काकड आरती होणार नाही. सोमवारी (दि. ११) सकाळी १० वाजता विक्रम नांदेडकर यांचे कीर्तन व दहीहंडी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेसातला अक्षय आयरे (मुंबई) यांचा सुस्वागतम रामराज्य नृत्यनाटिका सादर होणार आहे. उत्सव कालावधीत रोज सायंकाळी साडेसातला निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होतील. श्री साईसच्चरित्राच्या अखंड पारायणात जे भाग घेऊ इच्छितात अशा साई भक्त‍ांनी शुक्रवारपर्यंत (दि. ८) देणगी काउंटर नं. १ येथे नाव नाेंदवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले आहे.

उत्सवाच्या दिवशी मंदिर राहणार रात्रभर उघडे
उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवारी (दि. १० एप्रिल) पहाटे काकड आरती, पहाटे पावणेसहाला श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. सकाळी सव्वासहाला कावड मिरवणूक व श्रींचे मंगलस्नान होईल. सकाळी १० वाजता विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्मावर कीर्तन होईल. दुपारी चार वाजता निशाणांची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्रींच्या रथाची मिरवणूक निघेल. सायंकाळी साडेसातला विजय साखरकर (मुंबई) यांचा साईस्वर नृत्योत्सव होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...