आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​ससेहोलपट:ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यास पोलिस ठाण्यांची टाळाटाळ

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायबर क्राईमशी निगडीत ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे सर्व पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करून घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिले आहेत. मात्र, अद्यापही हे आदेश धाब्यावर बसवत जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाभरातील पीडितांना नगरच्या सायबर क्राईम पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी आहेत. पाच-सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पहिले सायबर पोलिस ठाणे नगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सुरुवात सुरू करण्यात आले. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्ह्यांच्या तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय या गुन्ह्यांच्या तपासाबाबत काही तांत्रिक माहिती मदत हवी असल्यास ती नगरच्या सायबर क्राईम पोलिस ठाण्याकडून दिली जाते. असे असतानाही समाज माध्यमावर बदनामी होत असल्याच्या व ऑनलाइन फसवणूक झालेल्या तक्रारदारांना स्थानिक पोलिस ठाण्यांचे अंमलदार गुन्हे दाखल न करता त्यांना नगरच्या सायबर पोलिस ठाण्याचा रस्ता दाखवत आहेत.परिणामी, जिल्हाभरातील तक्रारदारांना नगरला येण्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागतो.

त्यांचा पूर्ण दिवस नगरला येण्यात व जाण्यात वाया जातो. तसेच, काही दुर्गम भागातील पीडित तक्रार देण्यासही येत नाहीत. काही महिन्यांपूर्वी बेलवंडी येथील एका तरुणीला स्थानिक पोलिसांनी तक्रार न घेता सायबर पोलिसात पाठवले होते. हेलपाटे मारून त्रस्त झालेल्या या तरुणीने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे अधीक्षक पाटील यांनी याची गांभीर्याने दखल घेत दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना ‘सायबर फ्रॉड’ तसेच समाज माध्यमावरून धार्मिक, भावना दुखावणे, राजकीय, सामाजिक, भाषिक, प्रांतिक तेढ बदनामी करणे, खात्यावर पैसे भरणे आदी तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही जिल्हाभरातून तक्रारदार सायबर ठाण्यात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...