आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील रुंभोडी ग्रामपंचायती पाठोपाठ आता विधवा प्रथेविरुद्धचा ठराव आंबड व शेरणखेल ग्रामसभेतही मंजूर करण्यात आला. विधवा प्रथा बंद व्हावी असा ठराव तालुक्यातील आंबड ग्रामपंचायतीत ग्रामसभेने मंजूर केला. हा ठराव पुरुष व महिला दोन्हीही ग्रामसभेत एकमताने मंजूर झाला. तसेच शेरणखेल ग्रामपंचायतीतही ग्रामसभा होऊन विधवा प्रथेविरुद्धचा ठराव मंजूर केल्याची माहिती सरपंच दीपक पथवे यांनी दिली. दरम्यान आंबडच्या सरपंच रेश्मा कानवडे यांनी गावातील सर्व विधवा व एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यासारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याच धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार असूनदेखील या प्रथेमुळे या महिलांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे. यावेळी आंबड ग्रामपंचायतीत सरपंच रेश्मा कानवडे, उपसरपंच नाथु भोर, ग्रामसेवक संपत मधे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळचंद भोर, उपाध्यक्ष मधुकर भोर, माजी सरपंच रोहिदास जाधव, भास्कर कानवडे, सुधीर कानवडे, संदीप भोर, रामचंद्र हासे, ग्रामपंचायत सदस्य दगडू जाधव, प्रमोद भोर, संदीप जाधव, सुरेखा हासे, कविता भोर, बाईसाबाई जाधव, वैशाली गिर्हे उपस्थित होते. ग्रामपंचायतने समाजप्रबोधनपरचा हा ठराव मंजूर केल्याबद्दल ग्रामसभा संपल्यानंतर एकल महिला पुनर्वसन समितीचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी व प्राथमिक शिक्षक ललित छल्लारे यांनी सरपंच रेश्मा कानवडे यांना सन्मानित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.