आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील शाळांना अनुदान देण्यासाठी अकराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या निर्णयामुळे ६ हजार १० प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८३२ तुकड्यांना अनुदान मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे ६३ हजार ३३८ शिक्षक व कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. राज्यातील विनाअनुदानित शाळा, वाढीव तुकड्या व शिक्षण विभागातील विविध प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत मान्यता दिली.
आदिवासी शासकीय आश्रम शाळेतील १ हजार ५८५ रोजंदारी आणि तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णयही घेतला आहे. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी तांबे सातत्याने सरकारकडे प्रयत्न करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, कला व क्रीडा शिक्षक मागणी, नवीन शिक्षक भरती यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्रुटींच्या पूर्ततेनंतर २० टक्के अनुदानासाठी ३६७ शाळा तर ४० टक्के अनुदानासाठी २८४ शाळा पात्र आहेत.
२० टक्के अनुदान घेत असलेल्या २२८ शाळांना ४० टक्के तर ४० टक्के अनुदान घेत असलेल्या २००९ शाळांना ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच मूल्यांकनास पात्र परंतु, राज्य सरकारच्या स्तरावर अद्याप घोषित न केलेल्या ३ हजार १२२ शाळांना २० टक्के अनुदान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारसह राज्यातील शिक्षक व कर्मचारी संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.