आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी:साईबाबांचा 103 वा पुण्यतिथी उत्सव सुरू; मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, फुलांची सजावट

शिर्डी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी)च्या वतीने आयोजित केलेल्या १०३ वा श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे ५.०० वाजता श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण‍यात आली. या मिरवणुकीत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वीणा आणि मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब शिंदे व प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी प्रतिमा धरून सहभाग नोंदवला. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी प्रथम, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी द्वितीय, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांनी तृतीय व वैद्यकीय संचालक डॉ.प्रीतम वडगावे यांनी चौथ्या अध्यायाचे वाचन केले.

सकाळी ६.०० वाजता समाधी मंदिरात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. दुपारी १२.३० वाजता मध्यान्ह आरती झाली, दुपारी ०४.०० वाजता कीर्तन झाले तर सायंकाळी ०६.१५ वाजता धूपारती झाली. रात्री १०.३० वाजता श्रींची शेजारती झाली. रात्रभर श्री साईसच्चरित अखंड पारायण द्वारकामाई मंदिरात सुरू होते.

उत्सवाच्या मुख्य दिवशी शुक्रवार, १५ रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०५.१५ वाजता श्रींचे मंगल स्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०८.३० वाजता लेंडीबागेत शताब्दी ध्वजारोहण कार्यक्रम होईल. सकाळी ०९ ते ११.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींच्या समाधीसमोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता मध्यान्ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धूपारती होईल, तर रात्री १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल, असे मंदिर प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

आज भिक्षाझोळीचा कार्यक्रम
तसेच श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रूढी परंपरेनुसार भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्याअनुषंगाने उत्सवाच्या मुख्य दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या भिक्षाझोळीकरिता गावकरी व साईभक्तांकडून भिक्षा स्वीकारण्याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२, चावडी समोर, नाट्यगृहाशेजारी तसेच साईनगर मैदान येथे काउंटर्सची व्यवस्‍था करण्यात येणार आहे. गावकरी व साईभक्तांनी भिक्षाझोळीत दान, भिक्षा देताना मास्कचा वापर करावा व शारीरिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करून भिक्षाझोळी काउंटरवर दान, भिक्षा जमा करावी.

बातम्या आणखी आहेत...