आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारी:संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर शहरात दाखल

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे अहमदनगर शहरात शुक्रवारी (24 जून) दुपारी चार वाजता आगमन झाले. शुक्रवारी संध्याकाळचा व शनिवारचा मुक्काम या पालखीचा अहमदनगर शहरात राहणार आहे.

या ठिकाणी पालखीचे स्वागत व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 180 किलोमीटर पायी चालून आलेल्या या पालखीचा दोन दिवसाचा मुक्काम अहमदनगर शहरांमध्ये राहणार आहे. रविवारी ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

अहमदनगर शहरात प्रारंभी महापालिकेच्यावतीने निवृत्तीनाथांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. शिस्तबद्ध निघालेल्या या पालखीमुळे शहरातील वातावरण धार्मिक झाले होते. अहमदनगर शहराजवळील शेंडी भागातून दिंडी मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संत निवृत्तीनाथ महाराजांचे पालखीचे अहमदनगर शहरात आगमन होताच, ठिकठिकाणी नगरकरांनी स्वागत केले. या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले होते. वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी नियोजन केले होते. पालखी सोहळ्यात पाण्याची तसेच वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.