आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संगमनेर तालुक्यातील आंबिदुमाला येथे शुक्रवारी अनोखा शपथविधी पार पडला. पदाची शपथ घेण्यासाठी सरपंचाचे चक्क हेलिकाॅप्टरमधून शाही आगमन झाले. या सोहळ्याला पंचक्रोशीतील जनसमुदायाने हजेरी लावली. सनई चौघड्यांचा निनाद आणि ढोलताशांच्या गजरात लेझीम पथकाबरोबर गावातील महिलाही फेटे बांधून स्वागतासाठी सज्ज होत्या. बरोबर दुपारी १२ वाजता सरपंच जालिंदर गागरे (वय ४०) यांचे हेलिकाॅप्टरने सपत्नीक आगमन झाले. बारा बैलांच्या बैलगाडीतून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सगळे काही गावाच्या विकासासाठी...
‘गावाकडे चला’ असा नारा महात्मा गांधीजींनी दिला होता. त्याच ध्येयाने मी गावात आलो असून गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी हेलिकाॅप्टरने आल्याचे सरपंच जालिंदर गागरे यांनी सांगितले.
पाचशे जणांना रोजगार
सरपंच जालिंदर गागरे यांचा पुण्यात बाटलीबंद पाणी व कोरोगेटेड बाॅक्स तयार करण्याचा कारखाना आहे. गावातील ५०० तरुणांना त्यांनी रोजगार दिला आहे. त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे. त्यांच्यासह संपूर्ण पॅनेल बहुमताने विजयी झाला. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण असल्याने गागरे सरपंचपदी निवडून आले. हेलिकाॅप्टर भाडे व जेवणावळीवर लाखोंचा खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.