आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलजमाई:श्रीरामपुरात ससाणे गट व कांबळे यांची दिलजमाई

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व ससाणे गटात नगरपालिका निवडणुकीपासून कटुता निर्माण झाली होती. मात्र अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभानिमित्त माजी आमदार कांबळे व करण ससाणे एकाच व्यासपीठावर आले. शिवाय एकमेकांचा आदरार्थी उल्लेखही केल्याने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शिष्टाई करून दोघांमध्ये दिलजमाई केली की काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

श्रीरामपूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर माजी आमदार स्वर्गीय जयंत ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा विजय पण झाला. मात्र नगरपालिका निवडणुकीवेळी कांबळे यांनी ससाणे गटाला रामराम करून आदिक मुरकुटे यांच्या महाविकासघाडीला साथ दिली होती. त्यानंतर ससाणे गटाने २०१९ च्या निवडणुकी वेळी भाऊसाहेब कांबळे आमदार असतानाही ससाणे गटाने कांबळे यांच्या उमेदवारीला पक्षाकडे विरोध दर्शवला. आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या सल्ल्यावरून मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतले.

त्यावेळी त्यांना भाजप-शिवसेना युतीकडून शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी भाजपात प्रवेश केलेले विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही स्वतः त्यांच्या गाडीचे सारथ्य करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी काँग्रेसकडून हेमंत ओगले यांचे नाव चर्चेत होते. मात्र अचानक घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करीत विद्यमान आमदार लहू कानडे यांनी उमेदवारी मिळवली. परंतु आपल्याला कांबळे यांनी धोका दिला या भावनेने इर्षेला पेटलेल्या ससाणे गटाने आमदार कानडे यांना खंबीर साथ दिली व प्रचारात दगाबाजीचा मुद्दा पुढे केला. त्यात कांबळे यांचा पराभव झाला.

तेव्हापासून कांबळे व ससाणे गटाची दुरी वाढलेली राहिली. जाहीर कार्यक्रमात एकमेकांचे नावेही घेतली जात नव्हती. मात्र अशोक कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी माजी आमदार कांबळे, करण ससाणे व सचिन गुजर यांनी एकमेकांचा आदरार्थी उल्लेख केला. त्यामुळे भानुदास मुरकुटे यांनी शिष्टाई करून कदाचित कांबळे व ससाणे यांची दिलजमाई केली की काय? अशी चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...