आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब राज्यातील जालंधर येथे गोळीबार करून शिर्डीमधील हॉटेलमध्ये लपलेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पुनित ऊर्फ पिम्पु बलराज सोनी (वय २७, रा. जालंधर, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सोनी हा पंजाबमध्ये गुन्हा करून शिर्डीत भजन-कीर्तन करत होता. पोलिसांनी तब्बल १३३ हॉटेलची तपासणी करून त्याला शोधून काढले.
पुनित सोनी हा जालंधर येथे गुन्हा करून पसार झाला होता. तो सातत्याने स्वतःचे अस्तित्व, ओळख लपवून व ठिकाणे बदलून राहत होता. अखेर तो शिर्डी येथे असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली. त्यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. पोलिस महासंचालक कार्यालयाने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना याबाबत कळवून कारवाईचे आदेश दिले होते. अधीक्षक पाटील यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, सोमनाथ दिवटे, अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडगे, दत्ता हिंगडे, विजय वेठेकर, संदीप पवार, भिमराज खर्से, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवी सोनटक्के, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव यांच्या पथकाने तांत्रिक तपास व शिर्डीतील तब्बल १३३ हॉटेलची तपासणी करून आरोपी सोनीला हॉटेल निर्मल इन येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला पंजाब पोलिसांकडे सुपूर्त केले आहे. त्याच्याविरूध्द गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.