आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजेबाबत संगमनेर तालुका स्वयंपूर्ण करण्याचे स्व. भाऊसाहेब थोरात यांचे प्रयत्न होते. साखर कारखान्याने वीजनिर्मिती केली, मात्र सौरऊर्जेच्या माध्यमातून सर्व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तालुका विजेबाबत स्वयंपूर्ण करावा. थोरात यांची जन्मशताब्दी पुढील वर्षी आहे. या काळात निळवंडे धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळेल, मात्र आपण यानिमित्त जनतेच्या विकासासाठी महत्वपूर्ण योजनाचा संकल्प करावा, असे आवाहन प्रा. हिरालाल पगडाल यांनी केले आहे. अमृत उद्योग समूहाच्या वतीने थोरात कारखाना येथील प्रेरणास्थळावर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात पगडाल बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा बँकेचे संचालक मधुकर नवले, कांचन थोरात, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, अरुण कडू, उद्योजक राजेश मालपाणी, भाऊसाहेब कुटे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. पगडाल म्हणाले, भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी दंडकारण्य अभियानाची चळवळ दिली. त्यांचे जीवन संघर्षमय राहिले. संगमनेर-अकोले तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष केला. त्यामुळे ३० टक्के हक्काचे पाणी मिळाले. सहकारातून समृद्ध झालेला संगमनेर जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे. निळवंडेचे पाणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाईल, तेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण होईल.
विखे थोरात यांच्या संघर्षाचे विश्लेषण करताना ते म्हणाले, प्रवरेचे पाणी उचलण्याचा आपल्याला अधिकार नव्हता संघर्ष करून भाऊसाहेब थोरातांनी हा अधिकार मिळवला त्यामुळे हा संघर्ष वाढला . नवले म्हणाले, भाऊसाहेब थोरात यांनी पाण्यासाठी संघर्ष केला. मीटर हटाव चळवळ राबवली. सहकाराबरोबर शिक्षण आणि दुग्ध व्यवसायी जोड देता संगमनेर तालुका समृद्ध बनवला. एकही काम अर्ध्यावर सोडले नाही. वयाच्या उत्तरार्धात दंडकारण्य ही अभिनव योजना देशाला दिली. अनेक संकटे आली तरी त्यांनी विचार सोडला नाही. प्रास्ताविक प्रतापराव ओहोळ यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी, तर रणजीतसिंह देशमुख यांनी मानले.
देशासाठी विकासाचे मॉडेल
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, सहकार महर्षी थोरात यांनी समाजचिंतन, दूरदृष्टी व समाजाच्या तळमळीतून तालुक्यात विकासाचा पाया घातला. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका देशासाठी विकासाचे मॉडेल ठरला.
स्व. थोरात यांचे स्मारक उभारा
नव्या पिढीला भाऊसाहेब थोरात यांचे कार्य माहिती व्हावे, त्यापासून प्रेरणा मिळावी, यासाठी कारखाना कार्यस्थळावर स्व. भाऊसाहेब थोरात यांचे भव्य स्मारक उभारण्याचे आवाहन तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीत देशमुख यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.