आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे - पाटलांची अजित पवारांना साद:भाजपसोबत येण्यासाठी दिली हाक; परीक्षा संपल्यावर घड्याळ परत केले म्हणत चिमटा

अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, हा राज्याच्या राजकारणात अजूनही चर्चेचा विषय असताना भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा अजित पवारांना साद घातली. राज्याच्या हितासाठी अजित पवार यांनी पुन्हा भाजपसोबत यावे, अशी इच्छा विखे पाटील यांनी व्यक्त केली. अहमदनगरमधील प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे रविवारी ( ता. 12 ) राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

लवकर निर्णय घ्यावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे म्हणाले, फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व समाजघटकांच्या हितासाठी अजित पवारांनी पुन्हा भाजपमध्ये यावे. भाजपमध्ये येण्याबाबत त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि फडणवीसांनी लवकरात लवकर राज्यात भाजपचे सरकार आणावे, अशी इच्छा विखे पाटलांनी व्यक्त केली.

पवारांसोबत राजकीय मतभेद

शरद पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्यासोबत कधीही व्यक्तिगत संघर्ष नव्हता. शरद पवार यांचे मोठे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे आमच्याशी कौटुंबिक नाते आहे. त्यांनी प्रवरेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषवले आहे. काळाच्या ओघात प्रत्येकाने राजकीय भूमिका घेतल्या. माझ्या वडिलांनी, शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे राजकीय मतभेद झाले. मात्र, ते वैयक्तिक नव्हते. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चुकीच्या सल्लागारांना बाजूला करावे, असा सल्लादेखील यावेळी विखे पाटलांनी दिला. उद्धव ठाकरे हे संयमी आणि मितभाषी आहेत, असेही ते म्हणाले.

मंत्री होणे आवडेल

विखे म्हणाले, यापुढे मला विरोधी पक्षनेता नव्हे, तर मंत्री होणे आवडेल. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये जाण्याचा मी निर्णय घेतला. वडील सल्ला देण्यासाठी नसताना मी घेतलेला तो पहिलाच मोठा राजकीय निर्णय होता. मात्र, आता तो निर्णय योग्य वाटतो, असे विखे म्हणाले. तसेच, दहावीला असताना माझ्याकडे घड्याळ नव्हते. परीक्षेला जाताना वडिलांनी त्यांच्या हातातील घड्याळ काढून मला दिले. परीक्षा संपल्यावर मी ते घड्याळ परत केले. तेव्हापासून पुन्हा कधीही हातात घड्याळ बांधले नाही. हा माझा निर्णय योग्यच ठरला, असे विखे म्हणताच सभागृहात सर्वांनी त्यांना हसून दाद दिली.

बातम्या आणखी आहेत...