आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पारनेर:ग्रा.पं.प्रशासक नियुक्तीचा निर्णय बेकायदा, घटनाबाह्य निर्णय मागे घेण्याची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मागणी

पारनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ... तर शेवटचे आंदोलन करेन

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असे परिपत्रक काढून ग्रामविकास विभागाने घटनेची व कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रशासक नियुक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उपोषण करावे लागेल, असा इशाराही दिला आहे.

अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यात ग्रामविकास विभागाचे परिपत्रक जनतेची दिशाभूल करणारे, बेकायदा व घटनाबाह्य असल्याचा आरोप केला आहे. कुणा एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पत्रक काढून प्रशासक होणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ११ हजारांचा निधी बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना आपत्तीमुळे त्यांचा घोडेबाजार उघड करण्याची ही वेळ नाही, पण वेळी येईल तेव्हा पुराव्यानिशी कोणी कसा कसा घोडेबाजार केला हे उघड करू,असा इशाराही अण्णांनी दिला आहे.

... तर शेवटचे आंदोलन करेन
ग्रामविकास आणि त्याला लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबवणे ही दोन्ही कामे गेली तीस वर्षे करत आहे. आता ८३ वर्षांचे वय झाले आहे. उपोषण करणे शरीराला झेपत नाही. परंतु पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय झाला, तर शेवटचे आंदोलन करण्यास मला संकोच वाटणार नाही, असा इशाराही अण्णांनी दिला आहे.