आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस तपास:बटाट्याच्या गोण्यांखाली सापडले साडेसात टन रक्तचंदन; तब्बल पावणेचार कोटींचा माल जप्त

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या साठवलेला रक्तचंदनाचा मोठा साठा एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. बटाट्याच्या गोण्यांखाली हा साठा लपवून ठेवण्यात आला होता. तब्बल ३ कोटी ८३ लाख रूपयांचा ७ हजार ६६० किलो रक्तचंदनाचा साठा पोलिसांनी शोधून काढला आहे. या प्रकरणी चार जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोडाऊन मालक सदाशिव सीताराम झावरे (रा. वडगाव गुप्ता ता. नगर), लक्ष्मण शिर्के (कर्जुले हर्या ता. पारनेर), विठ्ठल बबन झावरे (रा. वासुंदा ता. पारनेर) व संतोष माने (रा. सावरगाव फाटा, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील गोडाऊन मालक सदाशिव झावरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

वखार महामंडळ परिसरात एका गोडाऊनमध्ये रात्रीच्यावेळी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांना मिळाली होती. शुक्रवारी रात्री उशिरा निरीक्षक आठरे यांनी उपनिरीक्षक दीपक पाठक, चांगदेव हंडाळ, पोलिस अंमलदार रावसाहेब लोखंडे, राजेंद्र गायकवाड, नंदकिशोर सांगळे, मच्छिंद्र पांढरकर, भास्कर मिसाळ, महेश दाताळ, किशोर जाधव, सचिन हरदास, भगवान वंजारी, किशोर धुमाळ, गिरवले यांच्या पथकासह गोडाऊनवर छापा मारला. बंद असलेले गोडाऊनचे कुलूप तोडले. आतमध्ये प्रवेश केल्यावर गोण्यामध्ये भरलेला बटाटा मिळून आला. पोलिसांनी गोण्याखाली पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाचा साठा मिळून आला.

रक्तचंदनाचा साठा सापडताच याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना कळविण्यात आले. ते आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. सदरचा साठा रक्तचंदनाचा असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष सर्व रक्तचंदन जप्त करून पोलिस ठाण्यात आणले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हंडाळ करत आहेत.

कारवाईनंतर नगरचा ‘पुष्पा’ चर्चेत!
नगर शहराजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाचा साठा सापडण्याची अलीकडच्या काही वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. अनेक महिन्यांपासून या भागात हा साठा केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या रक्तचंदन तस्करीचा मास्टर माईंड कोण व नगरमधून रक्तचंदनाची तस्करी करणारा ‘पुष्पा’ कोण? याची चर्चा शहरात रंगली आहे.

नगरच्या बाहेर मालाची विक्री
नगर शहरात मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला असला तरी या रक्तचंदनाची सर्वाधिक विक्री नगरच्या बाहेर मोठ्या शहरांमध्ये होत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. पोलिसांकडून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पसार असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...