आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सर्रासपणे सुरू सात अवैध दारू दुकाने; दहा वर्षांत अकोल्यातील शाहूनगरात अवैध दारूने घेतले 23 बळी

अकोले16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराजवळील एका शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकाम करून वसलेले शाहूनगर ८०० लोकसंख्येचे उपनगर. मजूर व कामगार लोक या परिसरात राहतात. इथे अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्रीची अनेक दुकाने सुरू आहेत. अकोले पोलिस ठाण्यापासून फक्त हाकेच्या अंतरावरील ७ ठिकाणी दिवसरात्र सर्रासपणे दारू विक्री होत आहे.

उत्पादन शुल्क व पोलिस अधिकारी तक्रारी घेत नाहीत व अवैध दारू विकणाऱ्यांवर कारवाईही करत नाहीत. मात्र सोमवारी ५ अवैध व्यवसायांवर कारवाई करून सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे यांनी तीन आरोपींना सुमारे ५६ हजारांची अवैध दारू पकडून अटक केली. यामुळे इथले अवैध व्यवसाय पुन्हा चर्चेचा विषय ठरले. शाहूनगरात दारू पुरवणाऱ्या देशी दारू दुकानांवर, इंदोरी व विरगाव फाट्यावरील अवैध व्यावसायिक दलाल व संगमनेर जवळील गुंजाळवाडी येथील दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली नाही, तर दारूबंदी आंदोलक शाहूनगरात दारूने उद्धवस्त झालेल्या कुटुंबातील २३ विधवा महिलांसह अकोले पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसू, असा इशारा दारूबंदी आंदोलनाचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी दिला आहे.

शाहूनगरात वास्तव्यातील कुटुंबातील शाळाबाह्य बालके, महिला, तरुण, अबालवृद्ध व रोजंदारीवर काम करीत असलेल्या महिलांची भेट घेऊन कुलकर्णी यांनी चर्चा केली. यातून मागील १० वर्षात शाहूनगर वस्तीतील ३९४ कुटुंबात केवळ दारूमुळे २३ व्यक्तींचे मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले. हा मृत्यूदर कोरोनातील मृत्यूपेक्षाही भयानक आहे. अजूनही अनेक तरुण दारूने मृत्युच्या दारात उभे आहेत. या वस्तीतील एका महिलेने पतीच्या दारूच्या त्रासाला वैतागून स्वतःलाच जाळून घेतले. गरीब कुटुंबातील दारूमुळे मृत्यू झालेले हे लोक कमी वयाचे होते. २३ पैकी ४१ ते ५० वयोगटातील ११ जण तर ३० ते ४० वयोगटातील ८ जण आहेत. १८ वर्षाच्या तरुणाचाही यात समावेश आहे. २३ पैकी २० जण ५० पेक्षा कमी वयाचे असून त्यात ८ व्यक्तीचे वय ४० पेक्षा कमी आहे.

यांच्या मृत्युनंतर संबंधित कुटुंबाची स्थिती विदारक आहे. हे सर्वजण असंघटित कामगार होते. त्यात १५ व्यक्ती हमाली, गवंडीकाम व रंगकाम करीत होते. एकही परवानाधारक दारू दुकान शाहूनगरात नसतानाही या वस्तीत ७ दारूची दुकाने सुरू आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...