आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी परिस्थिती:अहमदनगरमधील 5 तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, 51 हजार नागरिकांची टँकरच्या पाण्यावर तहान

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पाच तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने तब्बल 51 हजार नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत 36 गावांत 23 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थितीच्या तुलनेत टँकरची मागणी कमी आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2021 अखेर सरासरी 129 टक्के पाऊस झाल्यामुळे फेब्रुवारी ते मार्चअखेरपर्यंत गावतळी व जलाशयांत मुबलक पाणी साठा राहिला. एप्रिलनंतर मात्र, उद्भव कोरडे पडण्यास सुरूवात झाली. त्यानुसार एप्रिलअखेरपासून टँकरची मागणी वाढत आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी संगमनेर, अकोले, नगर, पारनेर व शेवगाव तालुक्यातील 36 गावे व 95 वाड्या वस्तीवर दररोज 92 खेपा टँकर मंजूर आहेत. त्यापैकी दररोज 80 खेपा पूर्ण होत असून सर्व खेपा या शासकीय टँकरने केल्या जात आहेत. सध्यातरी खासगी टँकर सुरू करण्याची गरज भासली नाही. परंतु, मान्सून लांबणीवर पडल्यास, मागणी वाढून खासगी टँकरही सुरू करावे लागणार आहेत.

टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात स्वतंत्र कक्ष कार्यरत असून दररोज गटविकास अधिकाऱ्यांकडून टँकरची मागणी व सुरू असलेल्या टँकरचा अहवाल मागितला जातो. ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरचे नियोजन सुरू आहे.

तालुकानिहाय सुरू असलेले टँकर

संगमनेर 19 गावे 47 वाड्या - 12 टँकर, अकोले 2 गावे 10 वाड्यांसाठी 3 टँकर, नगर 6 गावे 18 वाड्या 3, पारनेर 8 गावे 19 वाड्यांसाठी 4 टँकर तर शेवगाव तालुक्यात 1 गाव व एकच वाडीसाठी 1 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात दररोज 92 खेपा मंजूर असून त्यापैकी 80 खेपा होत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली.

बातम्या आणखी आहेत...