आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षणाचा फज्जा उडाला आहे. सतत सर्व्हर डाऊन होणे आणि किचकट प्रक्रियेमुळे प्रशिक्षणार्थी हैराण झाले आहेत, त्यामुळे प्रशिक्षण प्रक्रिया सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिला.
राज्यातील शिक्षकांना बारा वर्षाच्या सलग सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी व चोवीस वर्षाच्या सलग सेवेनंतर निवड श्रेणी लागू होते. यासाठी प्रशिक्षणाची अट असते. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण स्थगित होते. एनसीआरटीने यावर्षी हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातून ९० हजार ५०० कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून दोन हजार रुपये फी आकारण्यात आली. तीस दिवसात ५० तासात प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. मात्र, दिवसभर लॉगीनच होत नाही. सतत अडचणी येत असल्याने प्रशिक्षणार्थी वैतागले आहेत.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण घेतांना शासनाने प्रविष्ठ कर्मचाऱ्यांचे वय लक्षात घेऊन प्रशिक्षणाची सुलभ आखणी व सर्वसमावेशक कार्यप्रणाली राबवायला हवी. प्रशिक्षणाचा फज्जा उडाला असल्याने शिक्षक आमदार कपिल पाटील, संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी नाराजी व्यक्त केली . शासनाने सुवर्णमध्य काढावा, अशी मागणीही त्यांनी केली .
मुख्यमंत्र्यांना दिले पत्र
ऑनलाइन प्रशिक्षणाचा फज्जा उडाला असून, अनेकदा लॉगीन करतानाही अडचणी येतात. याबाबत शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठविले आहे. निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण सुरळीत करावी किंवा रद्द करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.-सुनील गाडगे, राज्य सचिव, शिक्षक भारती संघटना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.