आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे - फडणवीस सरकार कोसळणार:पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो येणाऱ्या आषाढीची महापूजा 'मविआ'चे मुख्यमंत्री करतील, मिटकरींचा दावा

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगतो येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. विशेष म्हणजे येणारा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला आज सुरुवात होतेय. या शिबिरापूर्वी मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही काल असाच दावा केला होता.

काय म्हणाले मिटकरी?

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सध्याच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष, आक्रोश आहे. जसे आषाढी आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात. आज कार्तिकी एकादशीचा दिवस आहे. पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगतो. येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील. देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करावी लागली. कदाचित त्यांच्या भाग्यात ही पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून नसेल.

शंभरच्यावर जागा येतील

मिटकरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मला विश्वास आहे शंभरच्यावर आमदार आमचा पक्ष निवडून आणेल. त्यासाठीच वेध भविष्याचा हे मंथन शिबिर आज शिर्डीमध्ये सुरू होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेच मुख्यमंत्री आगामी काळात तुम्हाला महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पाटलांचेही भाकित

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही काल असेच वक्तव्य केले होते. जयंत पाटील म्हणाले होते की, मध्यावधी निवडणुका केव्हाही लागू शकतात. त्यासाठी आमची तयारी आहे. आम्ही शिर्डीत जाऊन स्नेही खासदार सुजय विखे यांना सांगणार आहोत की, एक अधिवेशन झाले होते, तेव्हा सरकार पडले होते. आता आमचे शिर्डीतील अधिवेशन झाल्यानंतरही सरकार पडेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

बातम्या आणखी आहेत...