आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी-कोपरगाव पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि.११) होणार आहे. तालुक्यातील इंटरचेंजला जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डीचे नाव दिले आहे. या समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. या महामार्गाचे तालुक्यातील अंतर ३० किलोमीटर आहे. त्यामुळे या इंटरचेंजला शिर्डीसह शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज असे नाव द्यावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.
या परिसरात होणाऱ्या टोल प्लाझाला शिर्डी-कोपरगाव टोल प्लाझा असे नाव द्यावे, अशा मागणीचे निवेदन आमदार काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महामार्गाच्या कामाची शिर्डीपर्यंत पाहणी केली. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
कोपरगाव येथील इंटरचेंजला शिर्डी इंटरचेंज असे नाव दिले, ही तमाम साईभक्तांसाठी व कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार सकारात्मक भूमिका घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, असे आमदार काळे म्हणाले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे दिलीप बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, शंकर चव्हाण, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, महेश लोंढे, सुनील लोहकणे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डी कोपरगावपर्यंत काम पूर्ण होवून उद्घाटन होणार आहे. मात्र कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांच्यासह अनेक नागरिकांच्या काही अडचणी अजूनही सुटलेल्या नाहीत. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु असून या अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी आमदार काळे यांनी यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.