आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिर्डीतले साईभक्त शिवाजी गोंदकर यांच्या तक्रारीवरून हैदराबादच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरधर स्वामी, हिरालाल काबरा आणखी एका व्यक्तीचा संशयितामध्ये समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तक्रारदार गोंदकर यांनी 31 जानेवारी रोजी यूट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला. त्यात शिर्डीच्या साईबाबांविरोधात खोटे आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचे त्यांना आढळले. हे वक्तव्य आणि व्हिडीओ हैदराबादचे गिरधर स्वामी, हिरालाल काबरा (रा. हैदराबाद) यांनी पोस्ट केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर गोंदकर यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
व्हिडीओमध्ये हिंदू आणि मुस्लीम धर्मात तेढ निर्माण होईल, वक्तव्य केले आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. हैदराबादमध्ये जाऊन आरोपीचा शोध करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
देव-देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणे टाळा. सोशल मीडियावर दोन धर्मात आणि समुदायात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नका. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शिवाय साईबाबांविरोधात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांची पाळेमुळे खणायला सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच या संशयितांना बेड्या ठोकण्यात येतील, अशी शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.