आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिकस्थळे खुली:शिर्डीच्या साईंचा दरबार उद्यापासून भक्तांसाठी खुला, साई मंदिरात रोज 15 हजार भाविकांना दर्शन

शिर्डी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात ७ ऑक्टोबरपासून रोज १५ हजार भाविकांना ऑनलाइन पास काढून दर्शन घेता येईल. १० वर्षांखालील मुले, गरोदर महिला, ६५ वर्षांवरील व आजारी व्यक्तींना तसेच मास्क न वापरणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी मंगळवारी दिली.राज्य शासनाने ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे खुली करण्याचे आदेश दिलेले आहेत. काकड आरतीनंतर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मंदिर खुले राहील. दिवसभरात ज्या १५ हजार भाविकांना प्रवेश दिला जाईल त्यात सशुल्क पासेसही असतील. प्रत्येक तासाला ११५० जणांना प्रवेश दिला जाईल. online.sai.org.in संकेतस्थळावर ऑनलाइन पाससाठी बुकिंग करावी लागेल. प्रत्येक आरतीसाठी ८० जणांना प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक आरतीस प्रथम येणाऱ्या ग्रामस्थांना १० आरती पासेस साई उद्यान निवासस्थान येथून तर दर्शन पास मारुती मंदिराशेजारील शताब्दी मं‍डप काउंटरवर दिले जातील.

ग्रामस्थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्डाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. ऑनलाइनद्वारे २० आरती पास, अतिम‍हत्त्वाचे मान्यवर, देणगीदारांसाठी ५० आरती पास दिले जातील. भाविकांना सहा फुटाच्या अंतराचे पालन करावे लागेल. फुले, हार, साहित्य नेण्यास मनाई आहे. गुरुवारची पालखीही बंद राहील. साई सत्यव्रत व अभिषेक पूजेसह ध्यानमंदिर व पारायण हॉल बंद राहील. भाविकांना गेट नं. २ मधून प्रवेश दिला जाईल. द्वारकामाई मंदिर, समाधी मंदिर, गुरुस्थान मंदिरमार्गे ४ व ५ नं. गेटद्वारे बाहेर पाठविले जाईल. दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंग व पाय धुण्याची व्यवस्था राहणार आहे. ज्यांना ताप असेल अशा साईभक्तांना कोविड केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल.

ऑनलाइन बुकिंग मिळाल्यानंतरच दर्शनासाठी यावे, दर्शन पासवर नमूद वेळेतच प्रवेश दिला जाईल.बैठकीला जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, जिल्हा परिषद सीईओ राजेंद्र क्षीरसागर, डीवायएसपी संजय सातव, पीआय गुलाबराव पाटील, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, वैद्यकीय अधिकारी प्रमोद म्हस्के, तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते.

संस्थानच्या नियमावलीत जिल्हाधिकाऱ्यांकडून बदल
दुपारी १२ वाजता साईबाबा संस्थान प्रशासनाने पत्रकार परिषद घेत मंदिर सुरू करण्याबाबतच्या नियमावलीची माहिती दिली. १५ हजार भाविकांना दररोज परवानगी देतानाच १० हजार ऑनलाइन (५ हजार सशुल्क व ५ हजार निःशुल्क) ५ हजार ऑफलाइन सशुल्क आणि निःशुल्क असल्याचे जाहीर केले. दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शिर्डीसह शनिशिंगणापूर व इतर देवस्थानांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, साई मंदिरात दररोज १५ हजार भाविकांना दर्शन घेता येईल. त्यात १० हजार भाविकांना फ्री दर्शन पास तर ५ हजार भाविकांना सशुल्क दर्शन पासचा समावेश करण्यात आला आहे. व्हीआयपींना आॅनलाइन पास काढून दर्शन घेता येईल.

शनिशिंगणापूर : पूजा साहित्य नेण्यास बंदी
शिर्डीत येणारे बहुतांश भाविक शनिशिंगणापूरला दर्शनास जात असल्याने व तेथे ऑनलाइन दर्शन व्यवस्था नसल्याने तेथे दररोज २० हजार भाविकांना दर्शन घेता येऊ शकेल. मात्र, तेल व पूजेचे साहित्य नेण्यास बंदी असेल. - राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर

स्थानिकांनाही काढावा लागेल पास
साईबाबा संस्थानच्या नियमावलीत स्थानिक ग्रामस्थांना ऑफलाइन पास काढून दर्शन सुविधा दिली गेली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाइनऐवजी सर्व ऑनलाइन दर्शन पास असतील, असे जाहीर केल्याने स्थानिक शिर्डीकरांनाही ऑनलाइन दर्शन पास काढत दर्शन घ्यावे लागेल. दुकाने रात्री साडेआठपर्यंत सुरू राहतील. हॉटेल रात्री साडेदहापर्यंत सुरू राहतील. साई मंदिरात हार, फुले व प्रसाद नेण्यास बंदी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...