आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेश-विदेशातील साईभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या साईबाबा मंदिराचा कारभार पाहण्यासाठी ‘आयएएस’ अधिकारी नको, अशी ठाम भूमिका ग्रामसभेत शिर्डी ग्रामस्थांनी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने पी. शिवाशंकर या ‘आयएएस’ अधिकाऱ्यांची साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली.
त्यांनी तातडीने कार्यभार हाती घेताना, भाविकांसाठी मुलभूत सुविधा, सुकर दर्शन आणि भाविकांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कार्यवाही करण्याचे सूतोवाच केले. शिवाय, संस्थानच्या रुग्णसेवेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासह प्रलंबित विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान नूतन ‘सीईओ’समोर असणार आहे.
साईबाबा संस्थानवर ‘आयएएस’ अधिकारी असावा की नसावा, यावर मतमतांतरे असून, त्यावर सरकार निर्णय घेईल, परंतु पी. शिवाशंकर यांनी शिर्डीत येताच साईसंस्थानचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी कोणालाही ओळख न दाखवता, सामान्य भाविकांप्रमाणे दर्शनरांगेतून साईदर्शन घेतले. या काळात तीन तास दर्शनरांगेच्या प्रवेशद्वाराजवळ दलालाकडून भाविकांची कशी फसवणूक होते, मंदिरात होणारी रेटारेटी, कर्मचाऱ्यांचा भाविकांबरोबर होणारा संवाद, याबाबत त्यांनी पहिल्याच भेटीत निरीक्षणे नोंदवली.
पुढील काळात भाविकांना सुकर दर्शनाबरोबरच दलालांकडून भाविकांची फसवणूक होणार नाही, यावर आपण विशेष लक्ष देणार असल्याचे सूतोवाच करून त्यांनी भाविकांचा विश्वास संपादन करण्यासह संस्थान प्रशासनावर जरब बसवण्यासाठी उचललेले पहिले पाऊल स्वागतार्ह आहे.
पी. शिवाशंकर हे कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्याकडे साईसंस्थानची जबाबदारी सोपावली असावी. साईभक्तांसाठी पायाभूत सुविधांसह येथील रेंगाळलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. साईभक्तांच्या दानातून श्रीमंत असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.
साईसंस्थानचा लेजर शो-गार्डन प्रकल्प अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. रुग्णसेवा अडचणीत असून, संस्थानच्या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर व सुविधा देण्याची गरज आहे. नवीन दर्शनरांग प्रकल्प आणि शैक्षणिक प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण होणार आहे. शैक्षणिक संकुलाची इमारत आंतरराष्ट्रीय दर्जाची असली, तरी गुणवत्ता अंतरराष्ट्रीय दर्जाची करावी लागणार आहे.
साईसंस्थानमधील कायम कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न आहे. रुग्णसेवेचा विस्तार आणि सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल साईसंस्थानच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय झाला असताना, त्यावर अनेक वर्षापासून कार्यवाही झालेली नाही. नागपुरला नुकतेच सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाले, त्याच धर्तीवर शिर्डीतही अद्ययावत कॅन्सर हॉस्पीटल व्हावे, असे शिर्डीकरांची मागणी आहे.
शिर्डीतील मुख्य रस्त्यांचे रुपडे लवकरच पालटणार मंत्री विखे यांच्या पुढाकारातून शिर्डीच्या सौंदर्यीकरणासाठी राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी ५२ कोटींचा निधी मंज़ूर केला असून, लवकरच त्या कामालाही सुरवात होईल. त्यामुळे काही प्रमाणात शिर्डीतील मुख्य रस्त्यांचे रुपडे पालटणार आहे. तसेच, शिर्डीत लेझर शो प्रकल्प सुरू करण्याबाबत विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या शिर्डी भेटीत आग्रह धरला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मकता दर्शवत निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.