आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत साईबाबा संस्थानने १५ वर्षापूर्वीच अपारंपरिक उर्जा स्रोतांपासून वीजनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत १५ कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे वीज बिलात आता वार्षिक २ कोटींची बचत होत आहे. आशियातील सर्वात मोठ्या साई प्रसादालयातही देशातील सर्वात मोठ्या सोलार स्टीम प्रकल्पामुळे वर्षाकाठी १ कोटी रुपयांची बचत होत आहे. आता दररोज आणखी १० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ११ कोटी रुपये खर्च असलेला ग्रीड कनेक्टेड सोलार पॉवर प्रकल्प व त्यातून दररोज दीड मेगावॅट निर्मिती करण्यासाठी रूफ टॉप सोलार प्रकल्प सुरू करण्याची तयारी सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तिरुपती बालाजी देवस्थाननंतर वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होणारे साई संस्थान हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान ठरणार आहे.
देशात शिर्डी हे सर्वाधिक भक्तांच्या गर्दीचे क्रमांक एकचे तर श्रीमंतीत क्रमांक दोनचे देवस्थान आहे. येथे दररोज येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी-सुविधा पुरवताना वीज बिल व इंधनासाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत होता. यावर उपाय म्हणून संस्थानने सुपा (ता. पारनेर, जि.नगर) येथे १५ कोटी खर्च करून २००७ मध्ये २.५ मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारला. हा प्रकल्प देश-विदेशातील तीर्थस्थळांसाठी रोल मॉडेल ठरला. २००७ पासून आजपर्यंत या प्रकल्पातून सुमारे ६ कोटी ९६ लाख २७,४४० युनिटची विक्रमी वीजनिर्मिती झाली. त्यातून वर्षाकाठी दोन कोटी रुपयांचे उत्पन्नही साईंच्या झोळीत जमा होत आहे.
सोलार स्टीम कुकिंग प्रकल्प दिशादर्शक
साई प्रसादालयात अन्न शिजवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येतो. हा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी प्रसाद भोजन, नाश्ता पाकिटे, लाडू प्रसाद बनवण्यासाठी एलपीजी गॅसचा इंधन म्हणून वापर होत होता. त्यासाठी ५५० मेट्रिक टन गॅस लागत होता. संस्थानने खर्चाची बचत व्हावी आणि प्रदूषण टाळण्यासाठी प्रसादालयाच्या ११६८ चौरस मीटर छतावर १ कोटी ३३ लाख खर्च करून स्वयंचलित सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला. यामुळे वर्षाकाठी १२८ मेट्रिक टन इंधन गॅसची बचत होऊन १ कोटी रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प दिशादर्शक व फायदेशीर ठरला आहे.
नवीन सौर प्रकल्प लवकरच
साईबाबा संस्थानच्या सुपा येथे अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोगानंतर सर्वात मोठ्या साईबाबांच्या भोजन प्रसादालयात देशातील सर्वात मोठा सोलार स्टीम कुकिंग प्रकल्प निर्माण केला. आता साई संस्थानच्या विविध भक्तनिवासांच्या छतावर रूफ टॉप सोलार सिस्टिम प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी शासन स्तरावर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे . -राहुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान शिर्डी
सौरऊर्जेद्वारे भक्तनिवासात मिळते २४ तास गरम पाणी
संस्थानच्या भक्तनिवासात १२ हजार भाविक थांबतील अशी व्यवस्था असून तेथे २४ तास गरम पाण्यासाठी प्रति दिवसाला ५ लाख ११ हजार लिटर क्षमतेची सोलार हॉट वॉटर सिस्टिम आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी होऊन आर्थिक बचत झाली आहे. आता नव्याने उभारण्यात आलेल्या भक्तनिवासातही सौरऊर्जेचाच वापर होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.