आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसा जोपासला:​​​​​​​कोरोना काळात साईंच्या झोळीत वर्षाकाठी तब्बल 286 कोटींची कमी, तरीही 7 हजार रुग्णांवर मोफत उपचारातून जपला आरोग्यसेवेचा वसा

शिर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साई संस्थानने 2021-22 या आर्थिक वर्षात आरोग्यसेवेसाठी तब्बल 203 कोटी रुपयांची केली तरतूद

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या येथील साई मंदिरात कोरोनापूर्वी दर्शनासाठी वर्षाकाठी देश- विदेशातून सुमारे १.७० कोटी भाविकांचा राबता राहत असे. त्यातून वर्षाकाठी सरासरी तब्बल ३८० कोटींच्या आसपास दान जमा होत असत. परंतु, कोरोनाकाळामुळे मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने वर्षभरात केवळ ९४ कोटी दान जमा झाले असून वर्षाकाठी त्यात २८६ कोटींची कमी आली आहे. परंतु, तरीही आरोग्यसेवेचा वसा जोपासत संस्थानने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २०३ कोटींची तरतूद करुन साईंच्या खजिन्यातून अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत संस्थान रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये वर्षभरात तब्बल ७००० कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत.

आरोग्यसेवेचे आदर्श मॉडेल ठरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांचे नुकतेच कौतुक केले होते. साईबाबा सुपर स्पेशालिटी रूग्णालय, साईनाथ सामान्य रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये अत्याधुनिक उपचाराबरोबरच ६४० बेड कोरोना रुग्णांसाठी असून यात १४० ऑक्सिजन बेड आणि २० व्हेंटिलेटर्सचा समावेश आहे. रुग्णांबरोबरच नातेवाइकांनाही मोफत जेवण आणि निवासव्यवस्थाही करण्यात आली आहे.

लहान-मोठ्या व्यावसायिकांपासून हॉटेल उद्योग मोठ्या आर्थिक संकटात, सवलतीची मागणी
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे भाविक नसल्याने शिर्डीतील लहान- मोठ्या व्यावसायिकांपासून हॉटेल उद्योगही मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. करोडोंची आर्थिक गुंतवणूक असलेल्या हॉटेल व्यवसायाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देऊन सवलती देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लहान-मोठे व्यावसायिक आणि नगरपंचायत गाळेधारकांना दोन वर्षांचे गाळा भाडे व कर माफ करण्याची मागणी होत आहे.

संस्थानच्या रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना जेवणही मोफत दिले जात आहे.
संस्थानच्या रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना जेवणही मोफत दिले जात आहे.

गरीब रुग्णांना अत्याधुनिक उपचार
कोरोना संकटात गरीब रुग्णांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून दिले. नीता अंबानी आणि रमणी यांच्या तीन कोटींच्या दानातून एका मिनिटाला हवेतून १२०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लँट तातडीने उभारून आठ तासांत कोरोना रिपोर्ट देणारी अत्याधुनिक लॅबही रुग्णसेवेत दाखल करण्यात आली. - कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी

  • कोरोनापूर्वी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान एक कोटी ६५ लाख ८६ हजार २२ भाविकांकडून दर्शन. ३७९ कोटींचे दान जमा.
  • १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान एक कोटी ५७ लाख ३७ हज़ार ५६६ भाविकांकडून दर्शन. ३६२ कोटींचे दान जमा.
  • कोरोना संकटकाळात मंदिर भाविकांसाठी बंद झाल्यावर १ एप्रिल २०२० ते २६ मे २०२१ पर्यंत भाविकांकडून ऑनलाइन ९४ कोटी दान.

बातम्या आणखी आहेत...