आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने शिवसेनेच्याच पारनेर तालुकाप्रमुखास दमबाजी करून धक्काबुक्की केल्याची घटना नगरमध्ये घडली. विकास रोहकले असे धक्काबुक्की झालेल्या तालुकाप्रमुखाचे नाव आहे. यासंदर्भात रोहकले यांनी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शिंदेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. १० कोटींच्या विकास कामांच्या वाटाघाटीवरून हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. मार्केटयार्ड परिसरातील कार्यालयात घडलेल्या घटनेमुळे शिवसेना वर्तुळात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुकाप्रमुख रोहकले व जिल्हाप्रमुख शिंदे दोन दिवसांपूर्वी वाटाघाटीसाठी एकत्र आले.
यावेळी ''तू परस्पर कामे कशी आणली, तू, तुझा मुलगा, बायको नगर शहरामध्ये कशी राहतात तेच बघतो'', असे म्हणत शिंदे यांनी दमबाजी व धक्काबुक्की केली. अशी तक्रार रोहकले यांनी केली आहे. निधी आणि कामावरून शिवसेनेत झालेल्या वादाची मोठी चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विकास कामांसाठी निधी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच १० कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. त्याच्या वाटाघाटी, श्रेयावरून वाद सुरू झाल्याचे या घटनेतून समोर येत आहे.
अर्थकारणावरून शिवसेनेतील वाद ही नवीन गोष्ट नाही. चार वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे सुशिल खेडकर या पदाधिकाऱ्याशी विकास कामांवरून वाद झाले होेते. सार्वजनिक बांधकाम विभागाची एक निविदा शिरसाट यांच्या मर्जीतील ठेकेदाराला हवी होती. मात्र, खेडकर यांनी ऐनवेळी निविदा दाखल केली. त्यावरून शिरसाट यांच्या कार्यालयासमोरच वाद झाला होता. प्रकरण मारहाणीपर्यंत गेले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.