आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:मानाच्या मंडळांसह शिवसेना मिरवणुकीतील नंबरवर ठाम; शिंदे गटाच्या नंबरचा वाद अद्यापही कायमच

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने गणेश विसर्जन मिरवणुकीतील नगर शहर शिवसेनेच्या नंबरवर दावा केल्यामुळे निर्माण झालेला वाद अद्यापही कायम आहे. पोलिस प्रशासनाने पहिला मानाचा गणपती वगळता इतर मंडळांना चिठ्ठ्या टाकून नंबर देण्याचा तोडगा काढला होता. मात्र, मानाच्या मंडळांसह शहर शिवसेनेनेही याला कडून विरोध करत मिरवणुकीतील आमचे नंबर कायम राहतील, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक संपत शिंदे यांच्या उपस्थितीत मानाच्या गणेश मंडळाची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम नगरसेवक दत्ता कावरे, अविनाश घुले, बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, मनेष साठे, विक्रम राठोड, परेश लोखंडे, गणेश हुच्चे आदींसह मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील पहिला मानाचा गणपती असलेल्या विशाल गणेश देवस्थानचा गणपती वगळता निवडणुकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांना चिठ्ठी टाकून नंबर देण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने मांडला होता. मात्र, याला उपस्थित मंडळाच्या प्रतिनिधींनी व शिवसेनेच्या वतीने विरोध करण्यात आला. मानाच्या गणपती मंडळांचे नंबर व त्यांची जागा अनेक वर्षांपासून आहे तशीच आहे. शहराच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचीही परंपरा आहे. मानाच्या गणेश मंडळानंतर शहर शिवसेनेचे मंडळ मिरवणुकीत सहभागी होते. तसेच इतरही काही मंडळे सहभागी होतात. यापूर्वी जे क्रमांक देण्यात आलेले आहेत, ते तसेच ठेवावेत. ज्यांना नव्याने सहभागी व्हायचे आहे, त्यांना पुढचा नंबर द्यावा, अशी भूमिका यावेळी सर्वांनी मांडली.

मुख्यमंत्री शिंदे गटाच्या मंडळाला कोणता नंबर द्यायचा याबाबतचा वाद कायम आहे. पोलिस प्रशासनाने ही याबाबत अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. दरम्यान, मानाच्या गणेश मंडळांनी पहिला मानाचा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर त्यामागे तत्काळ आपापल्या नंबरनुसार सहभागी व्हावे. उशिरा येणाऱ्या मंडळामुळे मिरवणूक थांबणार नाही. त्यांना पुढच्या नंबरवर मिरवणुकीत सहभागी व्हावे लागेल. मिरवणुकीस उशीर न करता मिरवणूक वेळेत पार पाडावी, पोलिसांकडून कठोर भूमिका घेतली जाईल, असे पोलिस निरीक्षक शिंदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...