आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:शिवसेनेने वाढवले श्रेयवादाचे नारळ; उड्डाणपुलाची पाहणी करत शिवसैनिकांनी केले पुलाचे अनौपचारिक उद्घाटन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावरून राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी करून उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केल्यानंतर शिवसेनेने गुरुवारी उड्डाणपुलाची पाहणी करत व उद्घाटन करत श्रेयवादाचा नारळ वाढवला. यावेळी अवजड लोखंडी बॅरिकेटिंग करून शिवसैनिकांना अडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्नही फोल ठरला. उद्घाटनावेळी ळी नारळ फोडण्यासही पोलिसांनी विरोध केला मात्र विरोध जुगारून शिवसेनेने नारळ फोडला. त्यानंतर पोलिसांनी फुटलेला नारळ ताब्यात घेतला. शिवसैनिकांनी दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी व दिवंगत माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांचे फोटो झळकावून उड्डाणपुलावर प्रवेश केला.

शिवसेनेकडून उड्डाणपुलाची पाहणी करण्यात येणार असल्याचे सोशल मीडियातून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी मोठे व अवजड बॅरीकेट टाकून रस्ता अडविण्यात आला होता. मात्र, शिवसेनेचे पदाधिकारी ठाम राहिल्याने ठेकेदार संस्थेला क्रेन मागवून बॅरीकेट हटवावे लागले. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उड्डाणपुलावर जाऊन नारळ फोडत उद्घाटन केले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्यसहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अशोक बडे, दत्ता कावरे, विजय पठारे, संतोष गेनप्पा, अमोल येवले, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, बबलू शिंदे, परेश लोखंडे, पारुनाथ ढोकळे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, श्रीकांत चेमटे, शरद कोके, संदीप दातरंगे, अरुणा गोयल आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेने अधिकृत उद्घाटनापूर्वीच नारळ वाढवून उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्याने शहरात राजकीय श्रेयवाद सुरू झाला आहे.

विरोध कुणाचा, हे नगरकरांनाही माहिती : युवासेना सहसचिव राठोड
राज्यात अनेक जिल्ह्यात उड्डाणपूल होत असतांना नगरमध्येही पूल व्हावा, यासाठी माजी आमदार स्व.अनिलभैय्या राठोड यांनी मोठे प्रयत्न केले. ज्यावेळी राज्यात शिवसेना - भाजपची सत्ता होती, त्यावेळी उड्डाणपुल होणे किती गरजेचे आहे, हे वेळोवेळी सांगून मुंबईतही त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचेही मोठे योगदान आहे. परंतु आता यांना त्याचा विसर पडला आहे. या उड्डाणपुलाला कुणाचा विरोध होता, हे सर्व नगरकरांनाही माहिती असल्याचे युवासेना सहसचिव विक्रम राठोड यांनी सांगितले.

उड्डाणपुलाजवळ बंदोबस्त
उड्डाणपुलावरून शहरात राजकीय श्रेयवाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पाहणी कार्यक्रमात नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आता इतरही काही गट व पक्षांकडून उद्घाटन केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उड्डाणपुलाजवळ बंदोबस्त लावण्यात आला आहे. ठेकेदार संस्थेलाही संरक्षक कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना पोलिसांकडून यावेळी देण्यात आल्या.

सर्वांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न : शहर प्रमुख कदम
उड्डाणपूल व्हावा, यासाठी यासाठी माजी आमदार स्व.अनिल राठोड यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे मुंबईत, तर माझी खासदार दिलीप गांधी यांनी दिल्लीत पाठपुरावा केला. अनेक अडथळ्याची शर्यत पार करत अखेर या पुलाचे काम झाले. परंतु ज्यांच्या प्रयत्नांनी हा उड्डाणपुल झाला, ते दोन्ही नेते आज हयात नाहीत. ज्यांचे योगदान या पुलासाठी आहे, त्यांचा सोयीस्कर विसर पडला आहे. त्यामुळे आम्ही या पुलाचे उद्घाटन करुन त्यांच्या कार्याची जानी सर्वांना करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी यावेळी सांगितले.

नारळ वाढवण्यापूर्वीच महापौर शेंडगे गायब!
शिवसेनेकडून महापौर रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाची पाहणी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी उड्डाणपूलावर प्रवेश केल्यानंतर महापौर रोहिणी शेंडगे यांनी पुलाची पाहणी केली व उद्घाटनाचा नारळ वाढवण्यापूर्वीच त्या तेथून निघून गेल्या. महापौरांना उद्घाटन केले जाणार असल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे पाहणी करून, त्या निघून गेल्या. पाहणी झाल्यानंतर पुढे उद्घाटन झाले, असे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...