आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:शिवसेनेची अंबिकानगर, हिंदूराष्ट्रची श्रीरामनगर; आमदार गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नगरच्या नामांतराच्या मुद्द्याला वादाची फोडणी

राज्यात औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. यापूर्वी शिवसेनेने केलेली अंबिकानगर व हिंदूराष्ट्र सेनेसह हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेली श्रीरामनगर नावाची मागणी कायम असतानाच भाजपकडून आता अहिल्यानगर नावाची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रीया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नामांतर करण्याची मागणी केली आहे.अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करावे, अशी अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुठल्याही जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी थोर व्यक्तीचे नाव समोर येत असेल, तर त्याचे स्वागत करण्यासारखेच आहे. सामान्य लोकांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

नामांतर केल्याने महागाई कमी होईल का?
नामांतरे, जन्मस्थळाचा वाद, मंदिरे, मशिदी यातच भाजपला अधिक रस आहे. नामांतर केल्याने महागाई कमी होणार आहे का? नामांतर हा विकास, प्रगतीचा मुद्दा आहे का? सामान्यांचे प्रश्न, महागाई या विषयावर भाजपने बोलावे.''
दीप चव्हाण, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

..तर हा मुद्दाच निघाला नसता
गोपीचंद पडळकर यांना चौंडी येथे दर्शनासाठी जाऊ दिले असते, तर नामांतराचा मुद्दा त्यांनी काढला नसता. केवळ त्यांना रोखले गेल्याने त्यांनी हा नवा मुद्दा काढला आहे. मुळातच अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे, अशी मागणी यापूर्वीच शिवसेनेने केलेली आहे.'' संभाजी कदम, शहरप्रमुख शिवसेना.

नामांतर या विषयालाच विरोध
शहराला नाव कोणतेही दिले तरी त्याने येथील प्रश्न सुटणार आहे का? त्या-त्या जिल्ह्याचा इतिहास पाहून जिल्ह्याला नावे दिली गेली आहेत. त्यामुळे नामांतर या विषयालाच आमचा विरोध आहे. काहीतरी नवीन वाद निर्माण करणे, एवढेच काम पडळकर यांना आहे. '' प्रतिक बारसे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.

लोकभावना असल्यास पाठिंबा
सर्वानुमते निर्णय झाल्यास स्वागतच आहे. लोकांची भावना असेल, तर अहिल्यानगर नामकरण करण्यास आमचा पाठिंबाच राहील. मात्र, ज्या जिल्ह्यात अहिल्याबाईंचा जन्म झाला, त्या जिल्ह्याच्या प्रमुख शहरात त्यांचा साधा पुतळा उभारलेला नाही, याची खंत आहे.'' सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष, मनसे.

सध्या हा ट्रेंडच सुरु झालाय
सध्या नामांतर, नावे बदलण याचा ट्रेंड सुरू आहे. नाव बदलून विकास होत असेल, तर निश्चितच बदला. मात्र, केवळ राजकारण करण्यासाठी व नागरिकांचे मूळ प्रश्नावरुन लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे. २०१४ पासून जातीवर आधारीत राजकारण सुरु आहे. विकास, महागाई या मुद्द्यावर कुणी येऊ नये, यासाठी हे प्रकार सुरु आहेत. जातीयवाद निर्माण करून हिंदू- मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याच प्रयत्न सुरु आहे. त्याचाच हा भाग आहे.''
डॉ. परवेझ अशरफी, जिल्हाध्यक्ष, एमआयएम.

अहिल्यानगर नाव दिलेच पाहिजे
अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म जिल्ह्यात झालेला आहे. हिंदू समाज व महिलांसाठी त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांचे नाव देणे ही स्वाभिमानाची बाब आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती सर्वांच्या कायम स्मरणात राहावी, यासाठी अहिल्यानगर हे नाव दिलेच पाहिजे. शरद पवार, रोहित पवार यांनी अहिल्यादेवी यांच्याबाबत खूप प्रेम असल्याचे दाखविले, त्या पवारांनी आता पुढाकार घेऊन अहिल्यानगर नाव देण्याचा निर्णय घ्यावा.''
अरुण मुंढे, जिल्हाध्यक्ष भाजप

पडळकरांची शरद पवारांवर टीका
नुकत्याच पार पडलेल्या चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-नातवाच्या मुघलशाहीने पोलिस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखले. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो, अशी टीकाही पडळकरांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...