आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी विशेष भूमिका बजावणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप व केंद्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. विरोधकांवर खोटे आरोप करून केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून भाजप देशभरात सुडाचे राजकारण करत आहे, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी सोमवारी केला.
शिवसेनेचे प्रवक्ते व भाजपा विरोधात उघडपणे भूमिका मांडणारे खासदार राऊत यांना ईडीने कारवाई करत अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या नेतृत्वात संगमनेर बस्थानकासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांच्यावरील कारवाई विरोधात घोषणाबाजी करत किरीट सोमय्या यांचा फोटो जाळला. यावेळी अटकेचा निषेध करण्यात आला. जेष्ठ नेते दिलीप साळगट, जयवंत पवार, शहरप्रमुख प्रसाद पवार, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, विकास डमाळे, दीपक वनम, वेणुगोपाल लाहोटी, पैसा सय्यद, सचिन साळवे, राजाभाऊ सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख अमोल डुकरे, अमोल कवडे, अक्षय बिल्लाडे, विजू भागवत, अशोक सातपुते, प्रथमेश बेल्हेकर, दीपक साळुंखे, संघटक पप्पू कानकाटे, सुदर्शन इट्टप, अपंग सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, कांचन गायकवाड, त्रिलोक कतारी, महिला आघाडीच्या मंगल घोडके, सुरेखा गुंजाळ, आशा केदारी, बाळासाहेब घोडके व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खेवरे म्हणाले, भविष्यात जनता भाजपला उत्तर देईल. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या अन्य पक्षातील नेत्यांना भाजप प्रवेशानंतर क्लीन चिट कशी मिळते? हा संशोधनाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.